अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त
By निखिल म्हात्रे | Published: March 4, 2024 04:46 PM2024-03-04T16:46:19+5:302024-03-04T16:46:34+5:30
येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत.
अलिबाग - येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त कामाचा त्रास अधिकारी व कर्मचाऱ्यांना होत असल्याने ताण वाढला आहे.
रायगड जिल्हा हा मुंबई, पुणे महानगरांपासून हाकेच्या अंतरावर आहे. तसेच अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. त्यामुळे या कार्यालयातील पदे रिक्त राहणे सरकारच्या दृष्टीने नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. सरकारने पुढाकार घेऊन या कार्यालयातील पदे भरावी अशी मागणी जोर धरीत आहे.
सह जिल्हा निबंधक कार्यालयांतर्गत जिल्ह्यात दुय्यम सहाय्यक निंबधकांची ६ कार्यालय असून, त्यापैकी पनवेल येथे ५ आणि अलिबाग येथे एक कार्यालय आहे. तर १४ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. सह जिल्हा निबंधक वर्ग एक, वर्ग दोन, सह नगर रचनाकार एक असे तीन पदे असून, ती भरलेली आहेत. या कार्यालयात सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग सहा पदे असून, ५ पदे भरली आहेत. दुय्यम निबंधकाची १५ पदे असून, त्यापैकी ८ पदे भरली आहेत. वरिष्ठ लिपिक ८ पदे असून, ती भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिक २५ पदे असून, त्यापैकी केवळ ४ पदे भरण्यात आली आहेत.
शिपायांची २२ पदे असून, त्यापैकी ९ पदे भरण्यात आली आहेत. दप्तर बंद, पहारेकरी, चालक यांचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, ती अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.
रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, त्यांच्या आदेशानुसार पदे भरली जातील.
श्रीकांत सोनवणे,
सह जिल्हा निबंधक, अलिबाग रायगड