n लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत ३७० नागरिकांचे लचके तोडले आहेत. यामध्ये बालवृद्धांचा समावेश आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मागील तीन महिन्यांत उरण शहरातच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अशा प्रकारच्या शेकडो घटना घडल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी २४ तर बुधवारी १६ नागरिकांना श्वानदंश केल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती उनपचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. तर ग्रामीण भागातही ऑक्टोबर - ११०, नोव्हेंबर - १६६ तर डिसेंबर महिन्यातील १७ तारखेपर्यंत १०४ अशा तीन महिन्यांत ३७० नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले करून जखमी केल्याची आकडेवारी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बीजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. तीन महिन्यांपासून सुरू केलेल्या केंद्रात भटक्या कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत पथके नेमण्यात आली असल्याची माहिती उनपचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. पकडून आणण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना या केंद्रात चार दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते. या दरम्यान त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले जाते. तसेच त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजीही घेतली जाते. मात्र भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे उरण परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तीन महिन्यांत ४८७ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. आजही केंद्रात ३८ भटक्या कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत. निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडून आणले आहे त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. या दरम्यान काही श्वानप्रेमी, प्राणीप्रेमी संघटनांच्या विरोधालाही सामोरे जावे लागते.- संतोष माळी, मुख्याधिकारी
तीन महिन्यांत ३७० नागरिकांना कुत्र्याचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:37 PM