मोहोपाडा: विविध महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच अपघात होत आहेत. यामुळे रसायनी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना व धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेदरकारपणे वाहनचालकांना जरब बसली आहे. रसायनी वाहतूक पोलिसांनी महिन्याभरात ३७५ जणांवर कारवाई करीत ४०,८०० रु पयांची दंडवसुली केली असल्याचे वाहतूक पोलीस नाईक संदीप पाटील यांनी सांगितले.वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, रात्रीच्या वेळी वाहन थांबविताना पार्किंग लाइट लावणे आवश्यक आहे, नो पार्किंग क्षेत्रांत वाहने थांबवू नयेत, धोकादायक ओव्हरटेक करू नये, अवैध वाहतूक केल्यास व अतिवेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन रसायनी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संदीप पाटील यांनी केले आहे.रसायनी वाहतूक शाखेच्या प्रयत्नाने अतिवेगात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहेत. यावेळी दोनपेक्षा जास्त व्यक्ती दुचाकीवर बसणे, नंबर प्लेट नसणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली. या कारवाईत वाहन चालक विद्यार्थ्यांच्या गाडी चालविण्यास पालकच जबाबदार असल्याचे दिसून आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.महिन्याभरापासून सुरु असेल्या कारवाईत जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पीआय मनोज शिंदे व रसायनी पोलीस ठाण्याचे पीआय राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप पाटील, सहा.फौजदार रायसिंग वसावे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश म्हात्रे, राजेश दळवी यांचा सहभाग होता. (वार्ताहर)
३७५ वाहनचालकांवर कारवाई
By admin | Published: November 03, 2015 12:48 AM