अलिबाग : आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परीक्षा संपणार आहेत. त्यानंतरही शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. ७ मे रोजी लोकसभा निवडणूक कर्तव्यावर हजर राहावे लागणार असून, ८ मेपासून त्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना ३८ दिवसांची सुटी मिळणार आहे.
इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्यामुळे परीक्षा घेतल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एका महिन्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यांना उन्हाळी सुटी लागली आहे. ज्या शाळांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांना चालू आठवड्यात परीक्षा संपविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या तरी मुख्याध्यापक व शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया अजून सुरू न झाल्याने शाळांना तोवर उर्वरित ७५ टक्के प्रवेश पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत. शाळांनी आता त्याची तयारी सुरू केली आहे.निवडणुकीमुळे ८ मेपासून उन्हाळी सुटी१ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार निकालपत्र१५ जूनपासून पुन्हा सुरू होतील शाळादोन दिवस तयारीसाठी शाळेत यावे लागणार
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्या शाळांना ६ मेपासून लागणार आहेत, पण लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान असल्याने ८ मेपासून सुट्या लागतील. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जात आहेत.- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.