वैभव गायकर
पनवेल: शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते बेलापूर वाहतूक 38 तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.मात्र हा मेगाब्लॉक पुढे 43 तासांवर गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मेगाब्लॉक 1 वाजेपर्यंत संपेल या भावनेने पनवेल रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांना माघारी फिरत पुन्हा खाजगी वाहतूकीचा पर्याय निवडावा लागला.
1 वाजल्यापासून प्रवाशांना एक तासात वाहतूक सुरळीत होईल असे आश्वासन दिले जात होते मात्र पुढे 1 ऐवजी सहा वाजले तरी वाहतूक सुरळीत झाली नव्हती. सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने नेहमी पेक्षा कमी गर्दी प्रवाशांची होती.मात्र मेगाब्लॉक संपलेले असेल या भावनेने रेल्वे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना स्थानकात ताटकळत उभे रहावे लागले. पनवेल वरून सीएसटी,वाशी,बेलापुर,अंधेरी आदी ठिकाणी लोकल धावत असते. रेल्वेने हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा ब्लॉक पुढे वाढविण्यात आला.