महाड दुर्घटनेत ३९ तासांचे शाेधकार्य; चार कामगार बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:44 AM2023-11-06T06:44:11+5:302023-11-06T06:44:19+5:30
कंपनीत काम करत असलेल्या कामगारांपैकी सात कामगार जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. मात्र, अकरा कामगार बेपत्ता होते.
महाड : महाड औद्यागिक क्षेत्रातील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या औषधनिर्मिती कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला ५५ तास तर शोधमोहिमेला ३९ तास उलटले तरी बेपत्ता अकरा कामगारांपैकी चार कामगारांचा शोध अद्याप लागलेला नाही. शोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
येथील औषधनिर्मिती कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता आग लागली होती.
कंपनीत काम करत असलेल्या कामगारांपैकी सात कामगार जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. मात्र, अकरा कामगार बेपत्ता होते. या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक व इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली होती. घटनेनंतर सोळा तासांनंतर ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. बारा तासांच्या प्रयत्नानंतर सात जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडले होते. मात्र, ओळख पटली नव्हती. त्यानंतर इतर चार कामगारांचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता.
शोधमोहीम सुरूच
शोधमोहीम थांबवलेली नाही. बेपत्ता चार कामगारांचा शोध सुरूच आहे. एनडीआरएफचे जवान, आपदा मित्र आणि अग्निशमन दल या कारखान्यात पोकलेन, फोर क्लिप आणि क्रेनच्या सहाय्याने शोधकार्य करीत आहेत. कारखान्याच्या भिंती पाडणे, भरलेले रसायनांचे ड्रम बाजूला करणे, छप्पर तोडणे, स्फोटात कोसळलेला छत बाजूला करणे आदी काम ते करीत आहेत.
घटनास्थळी ५० पोलिस कर्मचारी तैनात
शोधमोहिमेला ३९ तास पूर्ण झाले असले तरी चार कामगारांचा शोध लागलेला नाही. युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ५० पोलिस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. जोपर्यंत या चार कामगारांचा शोध लागत नाही, तोपर्यंत शोधमोहीम सुरूच राहील.
- मारुती आंधळे, पोलिस निरीक्षक, महाड एमआयडीसी पोलिस ठाणे.