उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:49 PM2023-12-19T16:49:17+5:302023-12-19T16:49:51+5:30
वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक.
मधुकर ठाकूर, उरण : वारंवार नोटिसा बजावल्यानंतरही मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास दुर्लक्ष करणाऱ्या बोकडवीरा- उरण येथील मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर थकीत असलेल्या चार कोटी एक लाख २३ हजार ३९९ रुपयांच्या वसुलीसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीने मंगळवारी (१९) जप्तीची कारवाई केली.
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीचे हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि.प्रकल्प उभारण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या कंपनीने भेंडखळ ग्रामपंचायतीची २०१६ पासून मालमत्ता कराची मागील सात वर्षांची एकूण चार कोटी एक लाख २३ हजार ३९९ रुपये थकबाकी आहे.थकबाकीच्या रकमेचा भरणा मुदतीत करण्यासाठी ग्रामपंचायतींने कंपनीला वारंवार नोटीसाही बजावल्या आहेत. त्याचबरोबर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी थकबाकी भरण्यासाठी निर्वाणीचा इशारा देताना ३० दिवसात भरणा न केल्यास कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही बजावली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या नोटीसीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटिसालाही दाद देत नसल्याने अखेर मंगळवारी (१९) ग्राम विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, सदस्य अजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अक्षता ठाकूर, संगीता भगत,शितल ठाकूर,लिलेश्वर भगत, स्वाती ठाकूर,स्वाती घरत,प्राची पाटील, सोनाली ठाकूर आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली भेंडखळ ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई केली आहे.संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या जप्तीच्या कारवाईनंतर मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लागलीच वठणीवर आली.टर्मिनल व्यवस्थापक सोमन मुर्मू यांनी नांगी टाकत वरिष्ठांशी चर्चा करून मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम एका महिन्याच्या मुदतीत भरण्याची लेखी पत्राद्वारे हमी दिली आहे.महिन्यात थकबाकीचा भरणा न केल्यास पुन्हा एकदा प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा सरपंच मंजिता पाटील यांनी प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे.