शिवकालीन वैभव! भिवगडावर सापडले ४० तोफगोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:45 PM2019-12-31T23:45:01+5:302019-12-31T23:45:31+5:30
राजा शिवछत्रपती परिवाराकडून स्वच्छता मोहीम
- कांता हाबळे
नेरळ : राजा शिवछत्रपती परिवाराकडून रायगड विभाग वर्धापन दिनानिमित्त किल्ले भिवगडावर ३० डिसेंंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवकालीन पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढत असताना काही सदस्यांना शिवकालीन सुमारे ४० तोफ गोळे सापडले आहेत.
कर्जत तालुक्यातील भिवगड उर्फ भिमगड जवळील वदप व गौरकामत या दोन गावांच्या मागे टेकडीवर उभा आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून ८५० फुट आहे. गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. कर्जतपासून ५ किलो मीटर अंतरावर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ किलो मीटवर गौरकामत गाव आहे. या दोन्ही गावांतून भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते. अशा या शिवकालीन वैभवाचा ठेवा असलेल्या या किल्ल्यावर राजा शिवछपत्रपती परिवार रायगड विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम शिवछत्रपती परिवारासाठी तसेच सर्व शिवभक्तांसाठी अविस्मरणीय अशी ठरली आहे.
काही सदस्यांनी शिवकालीन पाण्याच्या टाक्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी काही फुटांवर गाळ बाहेर काढत असताना लहान मोठे गोल दगड सापडण्यास सुरुवात झाली, नंतर शहानिशा केल्यानंतर आढळून आलेले हे दगड नसून शिवकालीन तोफगोळे असल्याचे समजले. गाळातून हे सर्व व्यवस्थित बाहेर काढून स्वच्छ करून ठेवण्यात आले, शिवकालीन वस्तू मिळाल्याने परिवारातील सदस्यांमध्ये उत्साह वाढला. सर्व तोफगोळे बाहेर काढले त्यावेळी त्यात ४० लहान मोठे तोफगोळे असल्याचे समोर आले. या तोफ गोळ्यांचे परिवाराच्या वतीने जतन केले जाणार असून, त्यांचा अहवाल तयार करून राज्य पुरातत्व विभागास पाठविला जाणार असल्याचे राजा शिवछत्रपती परिवाराच्या सदस्यांनी यावेळी सांगितले, तसेच यावेळी भारतीय सेनेमध्ये सेवा करत असलेल्या आणि सर्व्हिस पूर्ण झालेल्या कर्जत तालुक्यातील सैनिकांच्या सन्मानार्थ ‘वीर जवान तुझे सलाम’ हा छोटासा कार्यक्रम घेऊन भारतीय सेनेच मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.