रस्ते स्वच्छ करणारी ४० लाखांची मशीन धूळखात; कर्जत नगरपरिषेदचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 01:09 AM2021-01-24T01:09:45+5:302021-01-24T01:09:56+5:30
कुशल कामगार नसल्याने येत आहेत अडचणी
कर्जत : कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर माती, धूळ स्वच्छ करण्यासाठी ४० लाख खर्चून कर्जत नगर परिषदने स्विपिंग मशीन खरेदी केली आहे. पालिकेचे प्रमुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडून ही गाडी चालविण्यासाठी एक्स्पर्ट कामगारांची नियुक्ती झाली नाही. परिणामी संबंधित गाडी पाच महिने पालिकेच्या आवारात धूळखात पडली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत ही क वर्ग नगर परिषद मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत येते. त्यामुळे कर्जत शहरातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. त्या निधीमधून कर्जत शहरातील बहुतेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनविले गेले आहेत. नागरिकांना या रस्त्यावरील धुळीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे स्विपिंग मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पालिकेत आणला गेला. ऑगस्ट २०२० मध्ये ही गाडी आणण्यात आली. त्यानंतर केवळ फेरफटका मारण्यासाठी ही स्विपिंग गाडी पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर काढली जाते आणि पुन्हा पालिकेच्या आवारात उभी केली जाते. त्यामुळे ४० लाख खर्चून आणण्यात आलेली ही मशीन कर्जत शहरातील नागरिकांना देखावा दाखवण्यासाठी आणण्यात आली आहे काय? असा प्रश्न आहे.
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. तर आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांना संपर्क केला असता पालिकेने स्विपिंग मशीन चालविण्यासाठी एक्स्पर्ट कामगार नव्याने भरला जाणार नाही, तर आपल्याकडे असलेल्या कामगाराला ही मशीन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती दिली. मात्र, गेल्या सहा महिन्यांत ही मशीन चालविण्याचे प्रशिक्षण का दिले नाही? याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.
तांत्रिक दोषही आढळले
ही मशीन खरेदी करताना कामगार वर्गासाठी जाहिरात काढणे आवश्यक होते. मात्र, निवड प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे परदेशी बनावटीची ती मशीन पावसाळा संपल्यानंतर स्थानिक कामगारांनी रस्त्यावर बाहेर काढली. त्यावेळी स्विपिंगमध्ये काही तांत्रिक दोष आढळले आणि त्याची दुरुस्ती पालिकेला करावी लागली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी अद्याप गाडीची माहिती असलेला एक्स्पर्ट टेक्निशियन ची नियुक्ती केलेली नाही.