भारत बंदच्या मोर्चात ४० संघटना सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:07 AM2020-01-09T00:07:33+5:302020-01-09T00:07:47+5:30
कर्मचारी विरोधातील सरकारचे धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक यांनी संप पुकारला.
अलिबाग : सर्वांना पेन्शन मिळावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे तत्काळ भरावीत, बेरोजगारांना रोजगार द्यावा, कामगार आणि कर्मचारी विरोधातील सरकारचे धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक यांनी संप पुकारला. बुधवारच्या संपात रायगड जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले. आंदोलकांनी मारुती नाका परिसरातील संघटना सदन येथून मोर्चाने सुरुवात झाली. बाजारपेठ मार्गे, जोगळेकर नाका, बालाजी नाका मार्गे इंडस्ट्रिअल हायस्कूल येथे मोर्चाची सांगता झाली.
देशभरातील सर्व सरकारी कर्मचारी, अनेक कामगार संघटना यांनी बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. या संपात देशातील केंद्र सरकारी व राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक तसेच बँक व पोस्ट कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे इंटक, सिटू इ. संघटनेशी संलग्न असलेले वीजमंडळ कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व महामंडळामधील कर्मचारी या संपात सहभागी होते. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत आलेल्या सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुसंख्य कर्मचारी, शिक्षकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही. या अन्यायकारक धोरणा विरोधात विविध कर्मचारी व शिक्षक संघटना सातत्याने सांविधानिक मार्गाने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने पीएफआरडीए हा कायदा मंजूर केला आहे. हा कायदा रद्द करून सर्वांना पेन्शन लागू करावी आदी प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, रायगड जिल्हा तलाठी संघ, रायगड जिल्हा नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, आदी संघटना,
पोस्ट कार्यालय, बँका व इतर केंद्र सरकारी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
या वेळी समन्वय समिती अध्यक्ष वि. ह. तेंडुलकर, मध्यवर्ती संघटना संघटना अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, महसूल संघटना जिल्हाध्यक्ष राकेश सावंत, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, मध्यवर्ती संघटना कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन
केले.