जयंत धुळप
अलिबाग : सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रासलेले ४०० च्यावर रुग्ण असून, त्यांना दरमहा दोन पिशव्या रक्त द्यावे लागते. अशा प्रकारे दरवर्षी रायगडला जवळ जवळ आठ ते दहा हजार रक्त पिशव्यांची गरज भासते. या रुग्णांसाठी आपण स्वेच्छेने रक्तदान करून त्यांच्या आयुष्यात हास्य फुलवू शकतो, त्याचबरोबर थॅलेसेमिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत सरकारी आरोग्य यंत्रणेस साहाय्यभूत असे जनप्रबोधन आणि अन्य आवश्यक साहाय्य करण्याची भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या बुधवारी झालेल्या कार्यशाळेतून पुढे आली आहे.
‘पहिले थॅलेसेमिया का ज्ञान फिर शादी और संतान’असे सूत्र स्वीकारणे अनिवार्य असल्याचे नमूद करून, रायगड जिल्ह्यातील थॅलेसेमिया हा आजार नेमका कसा नियंत्रणात आणता येऊ शकतो, यावर आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी या कार्यशाळेत सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्या अनुषंगाने उपस्थित डॉक्टरांबरोबर या विषयी चर्चा व विचारमंथन केले. आयएमएचे अध्यक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर आणि त्यांच्या सहकारी सदस्य डॉक्टरांच्या सहयोगातून येथील हॉटेल बिग्ज फ्लॅशच्या सभागृहात कटिन्यूअस मेडिकल एज्युकेशन (सीएमई) अर्थात सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण अंतर्गत आयोजित या कार्यशाळेत तब्बल १०० डॉक्टर्स सहभागी झाले होते.
रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी या वेळी जिल्ह्यातील थॅलेसेमिया आजाराबाबत शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या उपाययोजनांचे विवेचन केले. शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या नोंदीत जिल्ह्यात थॅलेसेमियाचे ३५ तर सिकलसेल अनिमियाचे ३० रुग्ण असल्याचे सांगितले. ही आकडेवारी जिल्ह्यातील हिमनगाचे टोक दशर्वणारी आहे. वास्तवात परिस्थिती गंभीर आहे. नवजात अर्भक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा विविध पातळ्यावर अधिकाधिक जनजागृती आणि संबंधित वैद्यकीय तपासण्या आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील थॅलेसेमिया आजार समस्या या अनुषंगाने या कार्यशाळेत आयोजित चर्चासत्रात ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर, रक्त संक्रमण व रक्ततज्ज्ञ डॉ. दीपक गोसावी, डॉ. एन जी. कुडतरकर, डॉ. सचिन जायभाये, डॉ. परवेझ शेख, डॉ. वैभव चेऊलकर व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. आयएमए अलिबागचे सचिव डॉ. संजीव शेटकार यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश विशद केला.आजार टाळण्याकरिता आवश्यक काळजीजवळच्या नात्यात लग्न टाळा. करायचेच असेल तर प्रथम रक्त तपासणी करा. आई व वडील दोन्ही थॅलेसेमिया मायनर असल्यास पुढील बाळासाठी गर्भावस्थेत १२ व्या आठवड्यात मुंबईत केईएम हॉस्पिटल येथे तपासणी अवश्य करावी जेणेकरून थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येणार असल्यास गर्भपात करणे शक्य होईल.थॅलेसेमियाग्रस्त बाळ होणार नाही, याकरिता पालक थॅलेसेमिया मायनर अथवा सिकलसेल ट्रेट नाही याची खात्री करा. मुला-मुलींचे (विशेषत: ९ व १० वीमधील) हिमोग्लोबिन जर ११ पेक्षा कमी असेल तर डॉक्टरांना दाखवून लोहाच्या रक्तवाढीच्या गोळ्या घेणे, जेणेकरून त्याचे हिमोग्लोबिन सामान्य होईल व ते आजारापासून दूर राहतील आणि दहावी व बारावीमध्ये अधिक नैपुण्याने पुढे येतील.थॅलेसेमिया मायनर आणि मेजर?थॅलेसेमिया मायनरग्रस्त व्यक्ती पूर्णत: सामान्य असतात. थोड्या प्रमाणात अॅनिमिया (हिमोग्लोबिन कमी) असते. थॅलेसेमिया मायनर असणाऱ्यांना बाहेरून रक्त द्यावे लागत नाही. जोपर्यंत थॅलेसेमियाची ‘एचबी इलेक्ट्रोफॉरेसिस’ ही विशेष तपासणी केली जात नाही, तोपर्यंत या व्यक्ती थॅलेसेमिया मायनर आहे की नाही, ते समजत नाही.लोकसंख्येच्या साधारण दोन ते दहा टक्के लोकांमध्ये हा आजार असून, अभिनेते अमिताभ बच्चन हे या आजाराचे उदाहरण आहेत. थॅलेसेमिया मेजरग्रस्त व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन तयार करणाºया दोन्ही जिन्स निरुपयोगी असतात. यात हिमोग्लोबिन कमी होते आहे की नाही, ते समजत नाही. बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट हीच या आजारावरील प्रभावी उपचार पद्धती असून ती मुंबई, वेल्लोर, अहमदाबाद, पुणे आदी मोठ्या शहरात उपलब्ध आहे. या आजारात नेहमी शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्यामुळे त्यांना दर महिन्याला अथवा गरजेनुसार दर १५ ते २० दिवसांनी रक्त द्यावे लागते.थॅलेसेमिया का आणि कोणाला होऊ शकतो?दोन्ही पालक (पती-पत्नी) सामान्य असल्यास त्यांना प्रत्येक वेळी निरोगी बाळ होईल. जर दोन्ही पालकांपैकी एक थॅलेसेमिया मायनर असेल, तर ५० टक्के अपत्य थॅलेसेमिया मायनर असू शकतात, म्हणजेच दोन्ही पालकांपैकी एकालाच थॅलेसेमिया मायनर असल्यास थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येऊ शकत नाही. प्रत्येक गर्भधारणेत, २५ टक्के थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त बाळ होऊ शकते. ५० टक्के थॅलेसेमिया मायनर बाळ होण्याची शक्यता असते वा २५ टक्के पूर्णत: सामान्य बाळ होण्याची शक्यता असते.थॅलेसेमिया म्हणजे?थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजार आहे, यात हिमोग्लोबिन कमी होते जे कोणत्याही औषधाने वाढविता येत नाही, तसेच औषधोपचाराने हा आजार पूर्णत: बरा होऊ शकत नाही. या आजाराचे रुग्ण ‘थॅलेसेमिया मायनर’ आणि ‘थॅलेसेमिया मेजर’ या दोन प्रकारचे असतात.