जासईत १९८४ च्या शेतकरी आंदोलनाचा ४० वा स्मृती दिन साजरा; ४० वर्षांच्या काळावधीनंतरही शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:27 PM2024-01-16T16:27:37+5:302024-01-16T16:27:45+5:30

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न " जैसे थे "

40th Commemoration Day of Farmers' Movement of 1984 in Jasai; Farmers even after 40 years | जासईत १९८४ च्या शेतकरी आंदोलनाचा ४० वा स्मृती दिन साजरा; ४० वर्षांच्या काळावधीनंतरही शेतकरी

जासईत १९८४ च्या शेतकरी आंदोलनाचा ४० वा स्मृती दिन साजरा; ४० वर्षांच्या काळावधीनंतरही शेतकरी

मधुकर ठाकूर

उरण  : जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.मात्र त्यानंतर ४० वर्षांचा काळावधी लोटल्यानंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे
प्रश्न जैसे थे आहेत.त्यामुळे शेतकरी,प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांचे पुनर्वसन,रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल असे विचार मान्यवरांनी मंगळवारी (१६) आयोजित करण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या अभिवादन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.

नवीमुंबई वसविण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यासाठी सुरुवात केली होती.संपादन जमिनीला विरोध करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी १९८४ साली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले.दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला.या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम),कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील ( पागोटे) यांनी बलिदान दिले.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हौतात्म्य पत्करलेल्या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १६ जानेवारी रोजी जासईत तर १७ जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी (१६) जासई येथील हुतात्मा स्मारकात सर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला.या सर्व पक्षीय अभिवादन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. जयंत पाटील, आ. महेश बालदी,आ. प्रशांत ठाकूर, माजी आ. बाळाराम पाटील,कामगार नेते महेंद्र घरत,भूषण पाटील,माजी पनवेल नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे,जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील,रवींद्र पाटील तसेच दिबा पुत्र अतुल पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.यावेळी
उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. 

यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना मनोगतातून शेतकरी,प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांचे पुनर्वसन,रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याचेही आवाहन करण्यात आले.

Web Title: 40th Commemoration Day of Farmers' Movement of 1984 in Jasai; Farmers even after 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.