जिल्ह्यातील ४१९ स्मशानभूमींची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:42 PM2019-03-03T23:42:20+5:302019-03-03T23:42:27+5:30

वाढदिवस म्हटला की मेजवान्या, पार्ट्यांचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्याचा ट्रेंड हल्ली सर्वत्र पाहायला मिळतो;

419 graveyards cleanliness in the district | जिल्ह्यातील ४१९ स्मशानभूमींची स्वच्छता

जिल्ह्यातील ४१९ स्मशानभूमींची स्वच्छता

Next

अलिबाग : वाढदिवस म्हटला की मेजवान्या, पार्ट्यांचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्याचा ट्रेंड हल्ली सर्वत्र पाहायला मिळतो; परंतु निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील स्मशानभूमींची स्वच्छता करून वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अलिबाग आणि पेण तालुक्यातील तब्बल ४१९ स्मशानभूमींतील तीन लाख २१ हजार ९४ चौरसमीटरचा परिसर स्वच्छ करून ८८ हजार ६६ किलो कचरा काढला. याकामी सात हजार दहा सदस्य सहभागी झाले होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश प्रत्येक नागरिकांनी अंगीकारल्यास आरोग्यदायी जीवन जगता येणार आहे.
स्वच्छ भारत अभियान देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या अभियानाचा प्रचार मोठ्या प्रमाणात देशभरात झाला. त्यामुळे या अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते; परंतु सदरची योजना सुरू होण्याआधीच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अशी समाजोपयोगी कामे केली जात आहेत.
गाव, वाड्या, रस्ते, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, पतसंस्था, एसटी स्टॅण्ड परिसर, न्यायालय, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या आहेत. मात्र, स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा संकल्प पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.
मोठमोठाले शुभेच्छाचे होर्डिंग, पार्ट्या शुभेच्छांचा वर्षाव, अगदीच वाटले तर वृद्धाश्रम अथवा दवाखान्यांमध्ये फळवाटप, गणवेश, शालोपयोगी वस्तूंचे वाटप असे कार्यक्रम करून वाढदिवस साजरे केले जातात.
सचिन धर्माधिकारी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क स्मशानभूमींची स्वच्छता
करण्याचा निर्णय घेऊन अलिबाग तालुक्यातील २७५ आणि पेण तालुक्यातील १४४ स्मशानभूमींची स्वच्छता केली.
>३ लाख २१ हजार ९४ चौ.मी.चा परिसर स्वच्छ
स्वच्छता मोहिमेंतर्गत ३ लाख २१ हजार ९४ चौ.मी. परिसराची स्वच्छता करण्यात आली. तब्बल ८८ हजार ६६ किलो कचरा काढण्यात आल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून देण्यात आली.
प्रत्येक गावांमध्ये स्मशानभूमी उभारली असून त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संबंधित ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. मात्र, काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी पसरलेली असते, त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून हजारो किलो कचरा गोळा केला.

Web Title: 419 graveyards cleanliness in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.