पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले. संसारराचा गाडा चालविणाऱ्या महिलावर्गाचा ५० टक्के आरक्षण नुसार सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीतही बोलबाला दिसून आला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सत्तेच्या चाव्या आता गृहलक्ष्मीच्या हाती येणार, हे निश्चित झाले आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये येत्या पाच वर्षांत महिला सरपंच विराजमान होणार आहेत. आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीपैकी तालुक्यातील अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी १, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी २, अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला ) ६, सर्व साधारण गटातील महिलांसाठी १२अशी सरपंचपदे आरक्षित झाली आहेत. १३ सरपंचपदे सर्व साधारण गटासाठी खुली राहिली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय आरक्षणमध्ये अनेक इच्छुक यांना धक्का बसला असल्याने येणाऱ्या ५ वर्षांतील निवडणुकीत नवीन चेहरे सरपंचपदी विराजमान हिण्याची चर्चा या आरक्षण नंतर राजकीय पटलं वर रंगू लागली आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे.
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती; 21 ग्रामपंचायतींत महिला राज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 9:19 AM