कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:16 AM2018-03-27T01:16:34+5:302018-03-27T01:16:34+5:30

तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत

43 lakhs for the supply of water to 34 villages, 53 shortage of water and tankers in Karjat | कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

Next

संजय गायकवाड  
कर्जत : तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ३४ गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे असून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी तोपर्यंत करायचे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी तळ गाठतात. परिणामी नळपाणी योजना मोडकळीस येतात. त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी काही मैल वणवण करावी लागते. अशा भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने बैलगाडी किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती अमर मिसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे आणि गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यात तालुक्यातील ३४ गावे आणि ५३ वाड्या अशा ८७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४३ लाख रु पयांची तरतूद करून ठेवली आहे.
शासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे, पण हे नियोजन १ एप्रिलपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंतचे आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात शासनाचे नियम अडथळे बनत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील रहिवाशांना आणि मुख्य म्हणजे महिलांना आतापासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेला नियम पुढे करून टँकर एप्रिल महिन्यात सुरू केले जातील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Web Title: 43 lakhs for the supply of water to 34 villages, 53 shortage of water and tankers in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.