महाड तालुक्यात ४३ शाळा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:19 AM2018-08-20T04:19:55+5:302018-08-20T04:20:25+5:30
दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पडून: मुलांसह शिक्षकांचा जीव धोक्यात; निधीच खर्च केला जात नाही
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील ४३ प्राथमिक शाळांमधील मुलांचे शिक्षण आणि जीव धोक्यात आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीकडे रायगड जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शिक्षणामुळेच मुलांचे भवितव्य घडते, पण दुर्गम आणि डोंगरी भागात वसलेल्या महाड तालुक्यातील वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. पूर्वी गाव तिथे शाळा अशी गावांची ओळख होती. मात्र, वाहतुकीच्या साधनांमुळे खेडी शहरांना जोडली गेली आणि सोयी-सुविधा गावांपर्यंत पोहोचू लागल्या. परिणामी गावामध्ये वयोवृद्धांशिवाय कोणतीही तरुण पिढी दिसत नसली तरी महाड तालुक्यातील अनेक खेड्यातील गाव अबाधित आहे. अशा गावांमध्ये उभारलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारती आजही अस्तित्वात असून, त्या ठिकाणी आजही शिक्षण घेतले जात आहे. मात्र, अशा शाळांकडे रायगड जि. प. ने दुर्लक्ष केले आहे.
इमारती धोकादायक बनल्यामुळे जीव मुठीत घेऊन मुले शिक्षण घेत आहेत, तर शिक्षकांनाही भीतीच्या छायेत शिक्षण द्यावे लागत आहे.
तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली असून, काही शाळांची दुरुस्ती झाली असली तरी आज ४३ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जि. प. कडे पडून आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील याकडे दुर्लक्ष करून असल्याने दुरुस्ती निधी खर्च केला जात नाही. यातील अनेक इमारतींनी शंभरी गाठली आहे. गतवर्षी शिरवली प्राथ.
शाळेची भिंत कोसळली. मात्र, दुरुस्ती झालीच नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक शाळा गळक्या असून, भरपावसामध्ये गळक्या छताखाली मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे, तरीही जि. प.कडून दुर्लक्ष होत आहे.
गावकरी मुलांच्या शिक्षणासाठी लोकवर्गणीतून पैसा जमा करत डागडुजी करत आहे. शिक्षण समितीकडे पुरेसा निधी नसल्याने डागडुजी करू शकत नाही. सध्या सर्व शिक्षा अभियान बंद पडल्यामुळे या शाळांची दुरुस्ती रखडली आहे. २०१७-१८ वर्षातील दुरुस्तीचे प्रस्ताव महाड शिक्षण विभागाकडून जि. प. कडे पाठविण्यात आले आहे. मात्र, ते तसेच पडून आहेत. नगरभुवन, वाकी, कातिवडे, गावडी, साकडी, कोंडिवते, कोलोसे, वाकी बु., मांडले, रेवतले उर्दू, किये, ब्रिजघर, कसबे, शिवथर यासह अन्य गावातील शाळांचा दुरुस्ती प्रस्ताव प्रलंबित आहे.
सध्या तालुक्यातील ४३ शाळा धोकादायक स्थितीत असून यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणाचा, तसेच त्यांच्या जीवाचा विचार करून जुन्या कौलारू इमारतींची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. महाड शिक्षण विभागाकडून पाठविलेल्या प्रस्तावावर जि. प. ने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीला मंजुरी द्यावी, अशी मागणी सामान्य नागरिक तसेच पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
सर्व शिक्षा अभियानामधील शाळा धूळखात
तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या चार भिंती आणि कौलारू प्रकारातील शाळा मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींमध्ये वर्ग भरविणे धोकादायक बनले आहे. पावसाळ्यात या इमारतींना गळती लागते,तर दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील बहुतांश शाळा दुरुस्त करण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी नवीन इमारती तयार केल्या आहेत.
परंतु पावसाच्या जोराने नवीन इमारतींचे स्लॅब गळके झाले, तर काही ठिकाणी इमारतीमधील स्लॅबचे छत शाळा सुरू असताना मुलांच्या अंगावर कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. मात्र, याविरोधात अधिकारी वा लोकप्रतिनिधी एक शब्दही काढत नाहीत. परिणामी याचे भोग शालेय मुलांना भोगावे लागत आहे.
महाड तालुक्यातील जवळपास ४३ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
- अरुणा यादव,
गटशिक्षण अधिकारी, महाड
प्रस्तावामधील काही शाळा सर्व शिक्षा अभियानामध्ये दुरुस्तीसाठी आहेत, तर जि.प. निधीतून फक्त २५ शाळांची दुरुस्ती करता येते. जिल्हा नियोजनामध्ये शाळा दुरुस्तीसाठी वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शाळांना दुरुस्ती मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. निधी उपलब्ध होताच दुरुस्ती तातडीने करण्यात येईल.
- अदिती तटकरे, अध्यक्ष,
रायगड जि. प.