रोहा : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती रोहयाचे तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी दिली आहे. यासाठी रोहा तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती.रोहा तालुक्यातील महाळुंगे, वरसे, तिसे, ऐनघर, वाशी, घोसाळे, गोवे, वरवटणे, वावे पोटगे, जामगाव, शेणवई, पळस, चिंचवली तर्फे दिवाळी, खांबेरे, धामणसई, शेडसई, तळाघर, कोंडगाव आणि मालसई या १८ ग्रामपंचायतींसाठी २८ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १४ आॅक्टोबरला वरील ठिकाणीच सकाळी ११ वाजता प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.१६ आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. २८ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, २९ आॅक्टोबरला शासकीय गोडाऊन रोहा तहसील कार्यालय शेजारी येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी दिली आहे. आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी व उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. (वार्ताहर)
रोहे तालुक्यात ४३३ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: October 15, 2015 1:49 AM