अलिबाग - रायगड जिल्हा प्रशासनाच्या हद्दीमध्ये ४४ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याचे सर्व्हेमधून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश स्थळे सिडको प्राधिकरणाच्या हद्दीतील आहेत. या स्थळांना हटवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी या अनधिकृत धार्मिक स्थळांना एक महिन्याची नोटीस दिली असून या कालावधीत या धार्मिक स्थळांना आपली कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या रस्ते व पदपथावरील धार्मिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांना हटवणे, स्थलांतरित करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या २९ सप्टेंबर २००९ च्या नंतर बांधकाम करण्यात आलेल्या धार्मिक अतिक्रमणांना कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणांवर प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
अतिक्रमणासंदर्भात समिती स्थापन करावी, असे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने ४४ स्थळांची यादी निश्चित केली. त्यामधील ‘अ’ गटातील धार्मिकस्थळे नियमित केली जाऊ शकतात, ‘ब’ गटातील नियमितीकरण करणे शक्य असलेली व ‘क’ गटातील स्थलांतर कराव्या लागणाऱ्या स्थळांचा समावेश आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळांच्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली असून सबंधितांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. या कालावधीत सबंधितांना संबंधित धार्मिक स्थळांबाबत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. - संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड.