चार वर्षांत ४५ बालकांचा मृत्यू
By admin | Published: November 14, 2015 02:20 AM2015-11-14T02:20:16+5:302015-11-14T02:20:16+5:30
शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर
दासगाव : शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शासनाच्या माता बाल संगोपनाच्या योजनेचे वाभाडे निघाले आहे.
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात असणाऱ्या विविध समस्यांमुळे गेली चार वर्षात जवळपास ४५ नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. याची धक्कादायक माहिती दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उघडकीस आली आहे. शासनाने बालसंगोपनाकरिता विविध योजना राबवल्या असल्या तरी ग्रामीण भागामध्ये या योजनांचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र बालमृत्यूच्या आकड्यामुळे समोर आले आहे. एका वर्षातील जवळपास ४५ बालकांचा मृत्यू या विभागात गेल्या चार वर्षात विविध आजारांमुळे झालेला आहे. ग्रामीण भागात नवजात बालकांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष देखील याला कारणीभूत ठरत आहेत. अशा योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या अशा स्वयंसेविका गरोदर मातांना बालकांच्या योग्य वाढीसाठी आणि त्यांच्या औषधोपचाराकरिता मार्गदर्शन करत असल्या तरी ग्रामीण भागापासून मूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर खूप जास्त असल्यामुळे तत्काळ आरोग्य सुविधा पुरवण्यास अडचण येते. यामुळे दासगाव खाडी पट्ट्यातील बाल मृत्यूचे दर वाढत आहे.
ग्रामीण भाग याविषयी आजही अज्ञानी असल्याने नवजात बालकांवर उपचार आणि त्यांची काळजी याबाबत दुर्लक्ष होत असले तरी शासनाच्या योजनांची देखील माहिती सहज उपलब्ध होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने दासगाव आरोग्य केंद्रापासून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर पसरलेल्या २२ गावे व त्या ठिकाणच्या वाड्यांना आरोग्य सेवा पुरवताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य योजना आजही घरोघरी पोहचवण्यास कमकुवत ठरत आहेत. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजही बालरोग तज्ज्ञ किंवा महिला विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत यामुळे या ग्रामीण भागातील महिला आणि बालरुग्णांना शहरामध्ये उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी न्यावे लागते. यामुळे आरोग्य केंद्राची सेवा असून नसल्यासारखी आहे. तरी बालमृत्यू थांबवण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)