जिल्ह्यासाठी ४५ लाख रोपांची निर्मिती; सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:38 AM2019-06-30T00:38:59+5:302019-06-30T00:39:24+5:30
यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.
अलिबाग : राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत यावर्षी ३३ कोटी वृक्षलागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात ३० ठिकाणी रोपवाटिका तयार करून ४५ लाख ७८ हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकम यांनी दिली आहे.
यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रस्ते, कालवे, समुद्रकिनारी, गायराने, पडीक जमिनी अशा ठिकाणी वृक्षलागवडीचे नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत १३ लाख ६० हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. हे अभियान १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग या अभियानात जिल्ह्यातील ८०५ ग्रामपंचातींना प्रत्येकी ३२०० या प्रमाणे रोपे मोफत उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यात संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात २५ लाख ७६ हजार इतकी रोपे सामाजिक वनीकरण विभाग उपलब्ध करून देणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका तालुकानिहाय याप्रमाणे अलिबाग तालुका- किहिम, तीनविरा, खानाव, मापगाव, वरंडे, लोणोरे, पेण तालुका- रामवाडी, कामार्ली, पनवेल तालुका- वावेघर, कर्जत तालुका- लाडिवली, तलवडे, कुरुंग, खालापूर सुधागड तालुका- वलाप, राबगाव, वावर्ले, रोहा तालुका- डोलवहाळ, संभे, वरसगाव, माणगाव व तळा तालुका- पहेल, तळेगाव, बोरगाव, हवेली, महाड व पोलादपूर तालुका- वरंडोली, नांदगाव, काचले, राजेवाडी, लोजारे, मुरुड तालुका वावडुंगी, आंबोली. म्हसळा व श्रीवर्धन तालुका- सरवर, रानवली.