आंबा शेतकऱ्यांना ४५ लाखांची मदत
By admin | Published: October 14, 2015 02:52 AM2015-10-14T02:52:23+5:302015-10-14T02:52:23+5:30
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा आंबा व कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
दासगाव : फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा आंबा व कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई महाड तालुक्यासाठी ३ कोटी ६५ लाख २० हजार ५३३ रुपये आली होती. या रकमेमधून ४८९ शेतकऱ्यांना एका महिन्यात ४५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदारांनी दिली.
२८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत महाड तालुक्यात अवेळी आलेल्या पावसाने ७,४७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे व कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. पंचनाम्यानंतर तातडीने शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाख २० हजार ५३३ रुपये एवढी मदत जाहीर केली. त्याप्रमाणे महाड तहसील कार्यालयात जमाही झाली. महाड तहसील कार्यालयाकडून आजपर्यंत आंबा नुकसानदार ४८९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ लाख २२ हजार १७५ रुपये एका महिन्याच्या आत जमा करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार संदीप कदम यांनी दिली तसेच उर्वरित आंबा नुकसान शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करून भरपाईचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
जवळपास ४,७७४ शेतकऱ्यांच्या कडधान्याचे नुकसान झाले आहे. या कडधान्य नुकसान शेतकऱ्यांची यादी महाड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष टी. एस. देशमुख व सचिव खेडेकर यांच्याकडू घेऊन संघटनेमार्फत या शेतकऱ्यांची लागणारी कागदपत्रे जमा करणार असून लवकर पैसे कसे मिळेतील यासाठी प्रयत्न करू असे तहसीलदार कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)