मुरुड : तालुक्याला शासनातर्फे आ. महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भात हमीभाव खरेदी केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या अल्प कालावधीत सुमारे ४५०० क्विंटल भाताची खरेदी झाल्याची माहिती आधारभूत भात केद्रांचे प्रमुख दिनेश मिणमिणे यांनी दिली आहे.
मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताच्या विक्रीसाठी रोहा, अलिबागशिवाय पर्याय नसे. तालुक्यात खार अंबोली येथे भात केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ वाचणार आहे. शासनाकडून सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू आदी भाताच्या वाणासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये इतका भाव घोषित करण्यात आला आहे. भात मोजणी प्रमाणित वजन काट्यावर केली जात असल्याने बळीराजाची फसवणूक टाळली जाईल. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यंत अल्पदरात नडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक टळली आहे. मुरुड तालुक्यात भातशेती लागवडक्षेत्र कागदोपत्री ३९०० हेक्टर असले तरी अतिअल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्षात ७०० ते ८०० हेक्टर भात क्षेत्र पडीक असल्याची वस्तुस्थिती नजरेआड करून उपयोगी नाही. हमीभाव मिळू लागल्याने काहीअंशी ओसाड जमीन लागवड क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे. बहुतांश भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तथापि, यंदा निसर्गचक्रीवादळ तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेेव्हा हमीभाव खरेदी केंद्रात भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस राज्य शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी खार अंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे.
भात खरेदी केंद्रावर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी भात जमा करावा, असे आवाहन दिनेश मिणमिणे यांनी केले आहे. मुरुड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांना हमीभाव केंद्रासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भातशेती परवडण्यासाठी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हमीभाव केंद्र मुरुड तालुक्यात नव्याने सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाताला वाजवी दर मिळाल्याने शेतकरी भात शेतीकडे पुन्हा वळतील. कोकणातील शेतकऱ्यांनी भातपीक काढणीनंतर कडधान्यासारखे पीक घेतले पाहिजे.