४६ अल्पवयीन मुली बनल्या माता; रायगडमधील धक्कादायक माहिती
By राजेश भोस्तेकर | Published: July 7, 2024 10:18 AM2024-07-07T10:18:38+5:302024-07-07T10:18:52+5:30
जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर
अलिबाग :रायगड जिल्ह्यात अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह होत आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ४६ अल्पवयीन मुली आई झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा रुग्णालयात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत १५ ते १८ वयोगटातील ४६ अल्पवयीन मुलींची प्रसूती झाली आहे. एप्रिलमध्ये ७ नॉर्मल, तर ३ सिझर, मे महिन्यात १४ नॉर्मल, ४ सिझर आणि जून महिन्यात १५ नॉर्मल, ३ सिझर प्रसूती झाल्या आहेत. अल्पवयात लग्न करणे हा गुन्हा आहे. मात्र, आजही काही समाजात जुन्या रूढी, परंपरा कायम आहेत. त्यामुळे अल्पवयात लग्न मुलीसाठी जीवघेणे ठरू शकते हे माहीत असूनही असे विवाह होतात. अल्पवयात गर्भधारणा झाल्याने तिची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने प्रसूती ही जिवावरही बेतते.
कारवाई झाली; पण...
अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीबाबत रुग्णालयाने न्यायालय आणि पोलिस प्रशासनाला माहिती देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, अल्पवयीन मुलींवर अजाण वयात पालकच जाणूनबुजून आई होण्याची जबाबदारी टाकून त्यांना संकटात ओढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन, शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.