रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमान
By Admin | Published: March 29, 2017 03:52 PM2017-03-29T15:52:57+5:302017-03-29T16:07:32+5:30
रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 29 - गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचं वाढलं असून, रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईपासून 135 किलोमीटर अंतरावर भीरा हे छोटंसं गाव आहे. भीरा येथे हायड्रो-इलेक्ट्रिक प्लँट आहे. भीराच्या खोलाखाल सोलापूर आणि जळगावमध्ये तापमान नोंदवलं गेलं आहे. भीरामध्ये बुधवारी 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे.
तर सोमवार आणि मंगळवारी सोलापूर आणि जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. भीरामध्ये टाटा पॉवर कंपनींचा तिसरा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाची स्थापना 1927ला झाली आहे. भीरा धरण हेसुद्धा टाटा पॉवरहाऊस धरणाच्या नावाने ओळखलं जातं. मुंबईकरांच्या वीकेंडसाठी हे आवडतं ठिकाण आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात होते. मंगळवारी नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेल्या ठिकाणांवरही सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. मात्र महाराष्ट्रात उष्णतेच्या लहरी नसल्याचं निर्वाळा देत हवेतील उष्णतेमुळे भीरामध्ये एवढं तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याचे व्ही. के. राजीव यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमानात अशीच वाढ राहणार असल्याचंही भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे.