48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
By निखिल म्हात्रे | Published: November 22, 2023 09:46 PM2023-11-22T21:46:10+5:302023-11-22T21:46:24+5:30
दुसऱ्या दिवशी कुस्तीमध्ये नवी मुंबई विभाग अव्वल
अलिबाग- 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यांमध्ये रायगड आणि नवी मुंबई विभागांनी दमदार कामगिरी केली. रायगड विभागाच्या पुरुष आणि महिला गटातील खेळाडूंनी विजयी घोडदाैड सुरु ठेवली आहे. कुस्तीमध्ये नवी मुंबई विभागाने सर्वाधिक यश मिळविले आहे.
रायगड पोलीस विभागातर्फे 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान अलिबागमध्ये होत आहेत. मंगळवारी दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या फुटबाॅल स्पर्धेत 6 सामन्यांपैकी तीन सामन्यात नवी मुंबई, रायगड, पालघर विजयी ठरले. तीन सामने अनिर्णित राहिले. रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. हाॅलीबाॅलच्या तीन सामन्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग विजयी झाले. यात रायगडने नवी मुंबईचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई विजेते ठरले असून रायगडने पालघरचा पराभव केला. खो-खोमध्ये रायगड, पालघर आणि नवी मुंबई संघ विजयी झाले असून रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. कबड्डीच्या तीन सामन्यात नवी मुंबई, रत्नागिरी, रायगड विजयी असून रायगडने पालघरचा पराभव केला आहे. हॅन्डबाॅलमधील तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण विजयी असून रायगडने रत्नागिरीचा पराभव केला आहे.
अॅथलेटीक्समध्ये रायगडने चांगले यश मिळवले आहे. 5000 मीटरमध्ये रायगडचा श्रीयश गुरव चतुर्थ, गोळाफेकमध्ये आकाश गोळे, राहुल राठोड, 400 मीटर धावणेमध्ये विशाल पाटील, शुभम नांदगावकर या रायगडच्या खेळाडूनी यश मिळविले. उंच उडीमध्ये रितेश यादव, महेश ठाकूर हे प्रथम व तृतीय क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या वजनी गटाच्या 10 प्रकारात नवी मुंबईच्या 14 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तर त्यापाठोपाठ रायगडच्या 13 कुस्तीपटूना क्रमवारीत स्थान मिळविले आहे.
महिलांच्या व्हाॅलीबाॅलच्या तीन सामन्यांत रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे विजेता असून रायगडने नवी मुंबईचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई संघ विजेते ठरले असून येथे रायगडने पालघरचा पराभव केला. खो-खोच्या तीन सामन्यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. तर नवी मुंबई, पालघर यांनीही आगेकुच केली आहे. कबड्डीच्या तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई, ठाणे विजेते ठरले. यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. अॅथलेटिक्समधील 5000 मीटरमध्ये रायगडच्या अपर्णा मगर, माधुरी लोखंडे यांनी यश मिळविले. उंच उडीमध्ये रत्नागिरीचे खेळाडू अव्वल आहेत. कुस्तीच्या 10 प्रकारच्या वजनी गटात रायगडच्या 12 खेळाडूंनी पहिल्या चार क्रमवारीत स्थान मिळवले आहे. त्यानंतर नवी मुंबईच्या 8, सिंधुदुर्ग 4, पालघर 6, रत्नागिरी व ठाणे ग्रामीणच्या प्रत्येकी तीन खेळाडूंनी पहिल्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.