नेरळ : कर्जत तालुक्यात पाच ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २८ बूथ उभारण्यात आले होते. या सर्व बूथवर चोख बंदोबस्त ठेवला असून, १०० मीटर अंतरावरील दुकाने बंद करण्यात आली होती, तसेच वाहनांनाही बंदी घालण्यात आली होती.
कर्जत तालुक्यात नेरळ, वाकस, उमरोली, रजपे, जामरुंग या ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतींमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत तीन ग्रामपंचायती येत असून यात नेरळ, वाकस, चिंचवली, पाली, उमरोली या ठिकाणी एकूण २८ बूथ उभारण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी नेरळ सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, तसेच दहा होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात दंगल नियंत्रण पथकाची गाडीही तैनात होती. दिवसभर मतदान शांततेत पार पडले.निवडणुकीची मतमोजणी ३ सप्टेंबरलाकर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींत सरासरी सुमारे ७५ टक्के मतदान झाले. ३ सप्टेंबरला मतमोजणी असल्याने चार दिवस उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद आहे. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानाचा टक्का दुपारपर्यंत कमी होता. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. त्या काळात मतदानाचा टक्का वाढला. अनेक मतदानकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदारांनी रांगा लावल्याने ५.३० नंतरही मतदान सुरू होते.