अलिबागमध्ये १५ सरपंचपदासाठी ५० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:59 AM2018-05-12T01:59:40+5:302018-05-12T01:59:40+5:30
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या १५ जागांसाठी ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर सदस्य पदाच्या १५७ जागांसाठी २७१ उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे
अलिबाग : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या १५ जागांसाठी ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर सदस्य पदाच्या १५७ जागांसाठी २७१ उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसीलदार कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५८ प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी १५ सरपंच आणि १५७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. आवास ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत ५ तर सदस्य पदासाठी २८, वाडगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शून्य व सदस्य पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शहाबाज ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत ७ तर सदस्य पदासाठी ३४ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. किहीम ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी १३, पेढांबे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ६, सदस्य पदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मानकुळे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी १९, वाघ्रण ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी १५,चिंचवली ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी ११, खंडाळे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शून्य तर १९ उमेदवारांनी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कामार्ले ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ६ तर सदस्य पदासाठी २६, खिडकी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नागाव ग्रामपंचायतीसाठी ४ सरपंच पदासाठी आणि २३ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. खानाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत फक्त एकच तर सदस्य पदासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.