पायपीट थांबणार : पेयजल योजनेसाठी ५० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:54 AM2018-09-01T04:54:23+5:302018-09-01T04:55:03+5:30
अलिबाग तालुक्यात श्रेयावरून भाजपा- शेकाप यांच्यात कलगीतुरा
अलिबाग : तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील १०९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ३४ योजनांना मंजुरी मिळून तब्बल ४९ कोटी ६६ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पेयजल योजनेमुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास मदत मिळणार असल्याची माहिती भाजपाचे अलिबाग-मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र विकासकामांच्या श्रेयावरून भाजपा आणि शेकाप यांच्यात आता चांगलाच कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसून येते. सध्या अलिबाग तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असली तरी बहुतांश कामे विविध कारणांनी लटकली आहेत. अलिबाग-रेवस रस्त्यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. परंतु शेकापच्या स्थानिक आमदारांनीच तो आणल्याच्या वल्गना केल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपाने जरी विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असला, तरी स्थानिक ग्रामपंचायती स्तरावरून विरोध होणार नाही का, असा प्रश्न मोहिते यांना विचारला असता,नागरिकांना विकास हवा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, परशुराम म्हात्रे, उदय काठे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत शेकापचे आमदार सुभाष पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, विकासकामांचे श्रेय शेकापने कधीच घेतले नाही. पाणीपुरवठ्याच्या भरीव निधीसाठी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत बैठकही घेण्यात आली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अलिबाग तालुक्याला सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील ३४ गावांत योजना राबवण्यात येणार आहे
गाव मंजूर निधी
ताडवागळे २ कोटी ८६ लाख
रांजणखार डवली ८९ लाख
परहूर १ कोटी
मिळकत खार ७० लाख
शहापूर ३ कोटी २३ लाख
मानतर्फे झिराड २ कोटी ४० लाख
वाघोडे ३९ लाख
सुडकोली ६३ लाख
रामराज १४ लाख
मुळे ४६ लाख
सारळ २ कोटी १८ लाख
गाव मंजूर निधी
मापगाव १ कोटी ७२ लाख
आक्षी २ कोटी २८ लाख
आवास २ कोटी ४१ लाख
थळ (चाळमाळ) १ कोटी ७८ लाख
खिडकी ४६ लाख
कुसुंबळे १ कोटी ४८ लाख
वाघ्रण ५७ लाख
धोकवडे १ कोटी ६४ लाख
सासवणे १ कोटी ५७ लाख
कुर्डूस ३३ लाख
चरी ३४ लाख
गाव मंजूर निधी
चिंचोटी ४९ लाख
कुसुंबळे १७ लाख
थळ (भाल,तुडाळ) १ कोटी ९० लाख
थळ (वायशेत) १ कोटी ४८ लाख
बोरघर ३६ लाख
चेंढरे ४ कोटी ८० लाख
चौल ३ कोटी १० लाख
रेवदंडा २ कोटी २३ लाख
नारंगी ४९ लाख २५ हजार
शिरवली २२ लाख
आंबेपूर ४ कोटी ९६ लाख