देहरंग धरणातून ५० लक्ष घनमीटर गाळउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:32 AM2018-06-08T05:32:14+5:302018-06-08T05:32:14+5:30
पनवेल : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेखाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेलमधील धरणांमधील गाळउपसा करण्यास मोफत परवानगी दिली होती. पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून ५0 लक्ष घनमीटर गाळउपसा झाला असून, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातून संपूर्ण पनवेल शहराला पाणीपुरवठा होतो. पाणीसाठ्याची क्षमता नसल्यामुळे धरणातील पाणी पनवेल शहराला वर्षभर पुरविता येत नाही. २00५ साली आलेल्या पुरात डोंगरावरून वाहून आलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आला आहे. धरण परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात धरण सुकले की गाळ काढून नेतात. मात्र, गाळउपशाची परवानगी नसल्यामुळे चोरी होत असल्याचा आरोप होतो.
तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी एप्रिल महिन्यात इथल्या वाळू उपशावर कारवाई करून दहा जणांविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे धरणातील गाळउपसा बंद पडला. धरणातील गाळउपसा झाला नाही तर पाणी साठविण्याची क्षमता वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांकडे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतकºयांना गाळउपशाची मोफत परवानगी देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केवळ देहरंग नव्हे तर तालुक्यातील सर्व धरणांतील गाळउपसा शेतकºयांसाठी मोफत करण्यात आला.
देहरंग धरणातून २५ एप्रिलपासून गाळ उपसा सुरू होता. आजूबाजूच्या शेतकºयांसोबत वीटभट्टी चालकांनी देखील याचा लाभ घेत गाळउपसा केला. दररोज अनेक टँकर उपसले जात होते. मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वी धरणातील सुमारे ५0 लक्ष घनमीटर गाळ उपसला गेला असावा असा दावा महापालिकेच्या अधिकाºयांनी केला आहे. गाळउपशामुळे धरणातील पाणीसाठ्याची क्षमता तेवढ्याच प्रमाणात वाढणार असल्याचेही पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.