अलिबाग : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील शेतजमिनींना चांगलीच ओल आल्याने शेतकरीवर्गाची भातपेरण्याची कामे गतिमान झाली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणार आहे.शुक्रवारी मृग नक्षत्रावर येणारा पाऊस समाधानकारक आणि पेरण्यांच्या उगवणीस पोषक होईल. त्याचबरोबर यंदाचा एकूणच सर्व नक्षत्रांतील पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज कृषी अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी बाळकृष्ण नारायण जोशी यांनी व्यक्त केला आहे. यंदा पाऊस शेतीला कमीही होणार नाही आणि अधिक होऊन नुकसानीही करणार नाही. त्याचबरोबर मोठ्या वादळाचीही परिस्थिती येणार नाही, असाही अंदाज जोशी यांनी व्यक्त केला आहे.२४ तासांत माणगाव येथे २६ मि.मी. पाऊसगुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात माणगाव येथे सर्वाधिक २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पनवेल व तळा येथे १३ मि.मी., श्रीवर्धन येथे १० मि.मी., उरण व पोलादपूर येथे ३ मि.मी., अलिबाग व महाड येथे २ मि.मी., कर्जत येथे ०.२ मि.मी., खालापूर येथे १ मि.मी. तर माथेरान येथे ९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर पेण, मुरु ड, रोहा, सुधागड, म्हसळा या ठिकाणी शून्य पावसाची नोंद झाली आहे.
भात पेरण्या ५० टक्के पूर्ण; मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:16 AM