पेणमधून ५० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती रवाना; पावसाळ्यापूर्वी परराज्यांतील ऑर्डर पूर्ण करण्याला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:39 PM2019-05-12T23:39:01+5:302019-05-12T23:40:33+5:30
पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे.
- दत्ता म्हात्रे
पेण : पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे. या मूर्तींच्या वितरणाला पेणमधून सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी मूर्ती त्या त्या राज्यांत पोहोचतील, याची दक्षता मूर्ती कार्यशाळांमधून घेण्यात येत आहे. सध्या आगाऊ नोंदणीनुसार गोवा, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यामध्ये इकोफ्रेंडली (शाडू मातीच्या) मूर्ती रवाना झाल्या आहेत. गोवा व गुजरात राज्यातील गणेशभक्तांकडून यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार मंगेश हजारे यांनी सांगितले.
यंदा गणेशोत्सव २ सप्टेंबर २०१९ रोजी असून कार्यशाळामध्ये नोंदविलेल्या आॅर्डर्स पूर्ण करण्याकडे मूर्तिकारांचा कल सुरू झाला आहे. पावसाच्या आगमनापूर्वी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती त्या - त्या राज्यामध्ये पोहचविणे, हे मूर्तिकारांना व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती नाजूक असल्याने त्या मूर्तीचे तूटफूट न होता ती आॅर्डर पोहच करण्यासाठी वितरण व्यवस्थेमधील अनुकूल अशा बाबींचा अभ्यास करून मे महिन्यातच या मूर्ती मागणीनुसार राज्याकडे रवाना केल्या जातात. पेणमधील प्रमुख कलाकेंद्रासह कोंबडपाडा, साई मंदिर, नंदीमाळनाका, कापुरबाग या परिसरातील कार्यशाळांमधून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती ट्रकमधून विशिष्ट पॅकिंगसह रवाना केल्या जात आहेत.
आतापर्यंत साधारणपणे ५० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये पोहच झाल्याची माहिती कार्यशाळेतील सूत्रांनी दिली. पेण शहरासह ग्रामीणमधील हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या ठिकाणच्या कार्यशाळांमध्ये सुद्धा शाडूच्या गणेशमूर्ती न रंगविता आॅर्डरनुसार पोहच केल्या जात आहेत. पेणमधील तब्बल २५० कार्यशाळांमध्ये शाडूच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात. यंदा अंदाजे दीड ते दोन लाख इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. यामूर्ती पाऊण फूट, एक फूट, दोन फूट व तीन फूट अशाच उंचीच्या साचेबद्ध बनविल्या जातात.ने - आण करण्यासाठी सुलभ अशी या गणेशमूर्तीची रचना असते.
दररोज आठ-दहा गाड्यांमध्ये मूर्ती रवाना
कमी उंचीच्या छोट्या व मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती शाडू मातीपासून बनविल्या जातात. पेणच्या कार्यशाळामध्ये यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना प्रचंड मागणी आहे. त्या अनुषंगाने यंदा मे अखेरपर्यंत इकोफ्रेंडली गणेश मूर्तींचे देशभरात वितरण करण्याकडे गणेश मूर्तिकारांचा कल दिसून येत आहे. सध्या पेणमध्ये दररोज आठ ते दहा गाड्या भरून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती वितरण सुरू आहे.