जिल्ह्यातील ५० टक्के व्यवहार आजपासून खुले, अत्यावश्यक सेवेमध्ये 'या' गोष्टींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:48 AM2021-06-07T10:48:06+5:302021-06-07T10:48:29+5:30
Raigad : राज्यात सोमवार (७ जून) पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
अलिबाग : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रायगडकरांसाठी सोमवार (७ जून) पासून नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
यामध्ये व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पाला दिलासा मिळाला आहे. अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने हा संपूर्ण आठवडा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सार्वजनिक बस वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू राहणार आहे.
राज्यात सोमवार (७ जून) पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे निषक ठेवून, निर्बंधांबाबत विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
सर्व अत्यावश्यक वस्तूंची व सेवांची दुकाने / आस्थापना या संपूर्ण आठवडाभर दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक बाबींशी निगडीत नसलेली दुकाने / आस्थापना या पूर्णतः बंद राहतील. मॉल्स / चित्रपटगृहे (मल्टीफ्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे पूर्णतः बंद राहतील. उपाहारगृहांमधून ऑर्डरप्रमाणे पदार्थ घेऊन जाणे, पार्सल देणे, घरपोच सेवा देणे इत्यादी परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणे / मोकळ्या जागेत सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत चालणे, सायकलिंग करणे यास मान्यता राहील. परंतु शनिवार व रविवारी परवानगी नसेल.
केवळ मान्यताप्राप्त / सूट देण्यात आलेली खासगी कार्यालये विहीत क्षमतेच्या मर्यादेत उपस्थितीच्या अधीन सुरू राहतील. कोविड १९ व्यवस्थापनासंबंधीत कामकाज पाहणाऱ्या व अत्यावश्यक (Emergency) सेवेशी निगडीत कार्यालयांमध्ये १०० उपस्थिती अनुज्ञेय राहील. इतर सर्व शासकीय कार्यालये (खासगी कार्यालयांना परवानगी दिली असल्यास तीसुध्दा) ही केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. अधिकच्या उपस्थितीची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. बाह्य मैदानी खेळास सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत मान्यता राहील.
सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. लग्न समारंभासाठी २५पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती अनुज्ञेय राहणार नाही. अनावश्यक गर्दी न होऊ देता (Non Covid व्यक्तींसाठी) आवश्यक शारीरिक अंतर (Physical distance) ठेवून कमाल २० व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील, या बाबींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण / प्रशासन यांची राहील. -व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर / सेंटरर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स हे दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू राहतील. तथापि, पूर्वनियोजित भेटी ठरवून, लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच प्रवेश असेल. सदर आस्थापनांमध्ये वातानुकूलन यंत्रणा सुरू ठेवता येणार नाही. सार्वजनिक बस वाहतूक ५० टक्के प्रवाशांच्या मर्यादेत सुरू राहील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. माल वाहतूक नियमित सुरू राहील. या वाहनांमध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्तिंना प्रवास करता येईल.
अत्यावश्यक सेवेमध्ये या गोष्टींचा समावेश
रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषधी कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यामध्ये त्याकरिता सहाय्यभूत उत्पादन व वितरण संस्था व त्यांची वाहतूक व पुरवठा साखळी तसेच लसीचे उत्पादन व वितरण, निर्जंतुकीकरण मुखपट्टी वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल पुरविणाऱ्या संस्था आणि सहाय्यभूत सेवा.
पशुवैद्यकीय सेवा / जनावरांची देखभाल व निवारा केंद्र आणि पाळीव प्राण्यांच्या खाद्याची विक्री करणारी दुकाने, वन विभागाने वनीकरणासंबंधीत घोषित केलेले सर्व उपक्रम.
विमानचालन आणि त्यासंबंधी सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल, माल, कॅटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.),
किराणा सामान, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन मटन / मासे विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने. शीतगृहे आणि गोदाम सेवा सार्वजनिक वाहतूक ट्रेन्स, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बसेस.
विविध देशांच्या दुतावासांच्या कार्यालयाशी संबंधित सेवा. स्थानिक प्राधिकरणांकडून केली जाणारी मान्सूनपूर्व तयारी कामे.
स्थानिक प्राधिकरणांकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा, मालाची वाहतूक. पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.
शेतीशी संबंधित उपक्रम आणि सर्व निगडीत क्रिया ज्या शेती उपक्रम अखंडित सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक आहेत, ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक बाबी बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती यांसारख्या बाबींचा समावेश आहे.