खालापूर : खोपोलीजवळ बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी राजस्थान येथून फिरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. लोणावळा व खंडाळा फिरून झाल्यानंतर अॅडलॅबला जात असताना शुक्र वारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला.राजस्थान येथून अविनाश अशोक जयसिंग (२६), पत्नी मिली अविनाश जयसिंग (२४) व मित्र राजेंद्र सरदार निर्मलसिंग मखिजा (२६) व अमृतकौर राजेंद्रसिंग मखिजा (२३) यांच्यासह महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. लोणावळा व खंडाळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर हे दोन्ही कुटुंब लोणावळा येथून खाजगी रिक्षा करून अॅडलॅब इमॅजिका हे थीम पार्क पाहण्यासाठी शुक्र वारी सकाळी येत होते. बोरघाटातील अवघड उतारावर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने शिंग्रोबा मंदिराजवळ असलेल्या सुमारे ५०० फूट खोल दरीत रिक्षा कोसळली.या अपघातात अविनाश जयसिंग यांचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकासह अन्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. सकाळी ११ वाजता ही घटना घडल्यानंतर खोपोली पोलीस, खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व यशवंती हायकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सतत पडणारा पाऊस व त्यामुळे निसरडी झालेली वाट यामुळे मृतदेह व जखमींना खोल दरीतून वर काढताना अडचणी येत होत्या. सकाळी सुरू झालेले बचावकार्य संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे यांच्या पथकाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
५०० फूट दरीत कोसळली रिक्षा
By admin | Published: August 14, 2015 11:40 PM