पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यातील ५००० कामगारांचा रोजगार बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:36 AM2020-12-01T00:36:47+5:302020-12-01T00:36:55+5:30
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती निर्मितीचे काम थांबल्याने अडचण
दत्ता म्हात्रे
पेण : गेल्या वर्षभरातील आठ महिन्यांत कोरोना महामारी कालावधीत टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती निर्माण करू नये, याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या बंदीच्या आदेशानुसार, पेण शहरासह हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या गणेशमूर्ती निर्माण करणारे कारखान्यातील सुमारे ४,५०० ते ५,००० प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती बनविण्याचे ओतकाम करणाऱ्या कारागीरांचा रोजगार बुडाला आहे. येत्या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पीओपीच्या गणेशमूर्ती निर्माण करू नये, याबाबत बंदी घालण्यात आल्याने आता या कामगारांना गावात मिळणारा रोजगार बुडाला आहे.
आपल्यावर उद्भवलेल्या अडचणींवर मात कशी करायची, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, हे मोठे संकट या कामगारांना समोर उभे राहिले आहे. पेण तालुक्यातील हमरापूर विभागात गणेशमूर्ती निर्माण करणारे कारखान्यांची संख्या ८०० ते ८५० आहे. या चार गावची लोकसंख्या आठ ते दहा हजारांची आहे. १९९०च्या दशकांपासून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी या व्यवसायात स्थिरस्थावर झाले होते. घरच्या घरी रोजगार व स्वयंरोजगार यामुळे मूर्तिकला फोफावली गावातील प्रत्येक तरुणाला या व्यवसायामुळे रोजगार मिळाला, तर काही तरुणांनी स्वतंत्र स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये चांगल्या आर्थिक प्राप्तीचा मार्ग व राज्याची प्रमुख गणेशमूर्ती बाजारपेठ गेल्या तीन दशकांपासून सुरू होती. सगळीकडे आर्थिक संपन्नता होती. मालक कामगार सगळेच समाधानी होते. पीओपीपासून गणेशमूर्ती ओतकाम करणारा कामगार दिवसाला ७०० रुपये मजुरी कमावत होता. रंगकर्मी व इतर अकुशल कामगार दिवसाला ३०० ते ४०० रुपये कमावत होते. मात्र, २०२० वर्षात गणेशमूर्ती कलेवर संकटची मालिकाच सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती निर्माण कराव्यात, यामुळे शाडू मातीच्या मूर्तीच्या निर्माण करणारे कारागीर व कामगार निर्माण करण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागेल. मात्र, या कुशल कामगार निर्माण करण्यासाठी प्रमुख गणेशमूर्ती निर्माण करणारे मूर्तिकारांची वानवा आहे. बाजारपेठ आता कुशल कामगार कारागीर यांच्या कमतरतेमुळे आर्थिक उलाढाल मोजक्या स्वरूपात राहणार आहे. या ५,००० कामगार सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल तेवढ्या दरात काम करीत आहेत
मूर्तिकारही आर्थिक संकटात
- गेली दोन वर्षे मूर्तिकार संकटात सापडला आहे. सरकारने मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातले. त्यामुळे तीन फूट उंचीच्या गणेशमूर्तीची विक्री झाली. चार फुटांपासून दहा फुटी उंच मूर्ती तशाच पडून राहिल्याने मूर्तिकारही आर्थिक अडचणीत आले.
- बँकांकडून घेतलेली कर्जे व कामगारांचा पगार याच ताळमेळ जुळेना अखेरीस कामगारांना काम मिळेनासे झाले. गणेशमूर्ती निर्माण करणारे कारखान्यांची ही व्यथा आहे, पण रोजगार कमावणारे ५,००० कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
- सरकारकडे रोजगाराच्या संधी कधी उपलब्ध होणार, याबाबत या ठिकाणी असंतोषाची तीव्र भावना आहे. गावातच मिळणारा रोजगार बुडाल्याने त्यांना भविष्यात येऊ घातलेल्या संकटांची जाणीव झाली आहे.