महाड : ए. टी. एम. कार्ड रिन्यू करायचे आहे, असे सांगून महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार परस्पर लंपास केल्याची घटना महाडमध्ये घडली आहे.प्राची प्रवीण शेठ (रा. पिडीलाईट कॉलनी, नांगलवाडी) यांच्या मोबाइलवर वर्मा नावाच्या व्यक्तीने २७ सप्टेंबर रोजी फोन केला आणि बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून तुमचे एटीएम कार्ड रिनिव्हल करण्यासाठी पासवर्ड व पीननंबरची माहिती मागितली. शेठ यांनी आपले खाते व एटीएम कार्डसंबंधी माहिती वर्मा याला दिली. यानंतर प्राची शेठ यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नांगलवाडी शाखेतील खात्यातून ५० हजार रूपये गायब झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शेठ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आॅनलाइन फसवणूक करून बँक खात्यातून रक्कम लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून सर्व बँकांकडून अनोळखी फोन वा मेसेजेसपासून ग्राहकांनी सावध रहाण्याबाबत वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. मात्र असे असूनही बँकेचे ग्राहक अशा फोनला बळी पडत असल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.