महिन्याभरात ५१ जणांना विंचूदंश
By admin | Published: June 8, 2015 11:10 PM2015-06-08T23:10:23+5:302015-06-08T23:10:23+5:30
महाड तालुक्यातील मोहोत येथील एका पंधरा वर्षांच्या मुुुलाचा विंचू चावल्याने मृत्यू झाला.
बिरवाडी : महाड तालुक्यातील मोहोत येथील एका पंधरा वर्षांच्या मुुुलाचा विंचू चावल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील बरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मे ते जून २०१५ या कालावधीमध्ये ५१ जणांना विंचूदंशाची बाधा झाली आहे. अशा प्रकारे विंचूदंश, सर्पदंश झाल्यानंतर आवश्यक असणारे उपचार ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने रु ग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोहोत येथील स्वप्नील शांताराम मोरे (१५) या युवकाला विंचूदंशाची बाधा झाल्यानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवले. महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी त्या रुग्णाची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाइकांना दिला. त्यानंतर सकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (वार्ताहर)