अलिबाग : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास शेतीचे मोठ्या संख्येने नुकसान होण्याची शक्यता आहे. नेहमीची सरासरी गाठण्यासाठी ५१ टक्के पावसाची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यावेळी जोरदार बरसून त्याने त्या महिन्याचा कोटा भरून काढला होता. पाऊस बरसल्याने शेतीच्या कामांनाही वेग येऊन बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. जुलै महिन्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात बरसून शेती आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र गेल्या दोन महिन्यात म्हणजे १ जून ते १० जुलै या कालावधीत एकूण २४ हजार ३०३ म्हणजेच सरासरी एक हजार ५१८.९५मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण ५० हजार २८२ म्हणजेच सरासरी तीन हजार १४२.६४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत बरसलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असले तरी शेतीच्या कामांसाठी अजून पावसाची गरज आहे. जिल्ह्यात भातपिकाचे एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे, तर नागली पिकाचे १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या पावसाला जोर नसला, तरी २० आॅगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पावसाने उघडीप दिल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता खंडाळे येथील शेतकरी नंदू शंकर सोडवे यांनी दिली. (प्रतिनिधी)
जिल्ह्याला ५१ टक्के पावसाची आवश्यकता
By admin | Published: August 11, 2015 12:30 AM