आविष्कार देसाईरायगड : जगभरात काेराेना लाटेच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र पहिल्या लाटेनेच ६१ ते ७० वयाेगटातील तब्बल ५१४ नागरिकांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक ४४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वयाेवृद्धांच्या आराेग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
मार्चपासून काेराेनाचा कहर जिल्ह्यात सुरू झाला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ४४३ जणांचा मृत्यू झाला. काेराेनाचा फटका वयाेवृद्धांना अधिक बसला आहे. आकडेवारी बघता ६१ ते ७० वयाेगटातील वयाेवृद्ध नागरिक हे संसर्गाचे बळी ठरले आहेत. काही कालावधीमध्ये काेराेनावर लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरकीडे दुसऱ्या लाटेने सर्वांच्याच चिंतेमध्ये भर घातली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून विविध उपाययाेजना आखल्या आहेत. तसेच नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन विविध पातळ्यांवरून केले जात आहे.
रायगड जिल्ह्यात पहिल्या लाटेचा प्रभाव सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी माेठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले हाेते. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वेगाने हाेऊन जिल्ह्यामध्ये काेराेनाचे रुग्ण माेठ्या संख्येने वाढले हाेते. आता दिवाळी सणानंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक माेठ्या संख्येने कामधंद्यानिमित्त या जिल्ह्यात जातात. सणासुदीला ते रायगड जिल्ह्यात परतले हाेते. त्यामुळे काेराेनाचा फैलाव ग्रामीण भागांमध्ये चांगलाच फाेफावल्याने येथे रुग्णसंख्या वाढली हाेती. ग्रामीण भागात १,०२५ नागरिकांचा बळी घेतला. तर पालिका क्षेत्रामध्ये हाच आकडा ५७७ आहे.