कर्जत : कुपोषणाचा विळखा एका कर्जत तालुक्याला नाही तर रायगड जिल्ह्यातील महाड, म्हसळा या तालुक्यांत देखील आहे. जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १९६ अतिकुपोषित बालके आढळली आहेत. एकट्या कर्जत तालुक्यात अतिकुपोषित बालकांपैकी ५३ बालके आहेत.२० आॅक्टोबर रोजी कर्जत तालुक्यात कुपोषित बालकाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार घेत असलेल्या बालकांचे वजन तपासले, तसेच उंची घेतली. आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कुपोषित बालकांची यादी पाहिल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात कुपोषित बालके आढळली आहेत. प्रशासन सॅम आणि मॅम म्हणजे अतिकुपोषित आणि तीव्र कुपोषित अशी गटवारी कुपोषित बालकांची करीत असते. यापूर्वीच्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यात १७५ अतिकुपोषित आणि ८४२ तीव्र कुपोषित बालके होती. त्यात वाढ झालेली दिसून येत असून हा सर्व्हे केवळ अंगणवाडी केंद्रावर येत असलेल्या बालकांचा केला गेला आहे. त्या सर्वेक्षणात अंगणवाडी केंद्रावर न येणारी असंख्य बालके असून, त्यांची तपासणी यात अंतर्भूत नसते. तसेच सर्व शहरी भागात अंगणवाड्या नसल्याने हे सर्वेक्षण प्रामुख्याने ग्रामीण भागात राहणाºया बालकांचे आहे हे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत असलेल्या ३२८३ अंगणवाडी केंद्रावरील बालकांची तपासणी करून हे सर्वेक्षण तयार केले आहे. सर्वेक्षण करताना साधारण दीड लाख बालकांची उंची मोजण्यात आली असून, वयानुसार वजन देखील मोजण्यात येऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासन जो सकस असा सूक्ष्म पोषक तत्त्वविरहित आहार असलेली पाकिटे प्रत्येक बालकांना महिन्याला दोन या प्रमाणात देत असतो. त्या पाकिटातील सकस आहार ९५ टक्के बालके खात नसल्याचे पोषक हक्क गटाच्या राज्यातील सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे असा सकस पोषण आहार बंद करून शासनाने कडधान्य स्वरूपात पोषण आहार देण्याची शिफारस केली आहे.महिला बालविकास विभागाचे सर्वेक्षणरायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक अतिकुपोषित बालके कर्जत तालुक्यातील दोन्ही गटांत आढळली आहेत. कर्जत तालुक्यात आज ५३ बालके अतिकुपोषित आहेत, हा आकडा यापूर्वीच्या सर्व अतिकुपोषित बालकांमध्ये जास्त आहे.त्या वेळी तालुक्यात १४६ तीव्र कुपोषित म्हणजे मॅम श्रेणीमधील बालके आहेत. जिल्ह्यात त्या खालोखाल महाड तालुक्यात २३ कुपोषित बालके असून, तेथे ३१८ अंगणवाड्या असून, श्रीवर्धन तालुक्यात देखील कुपोषित बालकांची संख्या मोठी असून, तेथे २४ बालके या यादीत आहेत.म्हसळा हा तसा लोकसंख्येने लहान असलेल्या तालुक्यात देखील कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. कुपोषणाचा वाढता आलेख लक्षात घेता जिल्ह्यात ६ महिन्यांपासून ३ वर्षांपर्यंत वयोगटातील बालके ही मोठ्या गटातील बालकांपेक्षा अधिक प्रमाणाने कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल काही सामाजिक संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणात लहान गटातील बालकांना अंगणवाडी केंद्रावर दिला जाणारा आहार हा सकस नसल्याचे आढळून आले आहे.कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात अंगणवाडी केंद्रातील बालकांची आरोग्य तपासणी वेळेवर होत नाही, महिला बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका या दर महिन्याऐवजी तीन-चार महिन्यांतून एकदा अंगणवाडी केंद्रावर पोहचतात. असे प्रकार वारंवार होत असल्याने कर्जत तालुक्यात कुपोषण कमी होत नाही. दुसरीकडे अंगणवाडीमधील बालकांना दिली जाणारी पोषण आहाराची पाकिटे ही बहुतेक ठिकाणी त्या पाकिटातील खाद्य गुरांना टाकले जाते किंवा घरात बाळगलेल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून टाकले जाते. त्याशिवाय त्या पाकिटातील खाद्य हे नदीमधील मासे पकडण्यासाठी माशांचे खाद्य म्हणून देखील वापरात येत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. त्यामुळे असा पोषण आहार शासनाने बंद करून त्या ठिकाणी कडधान्यांचा आहार देण्यात यावा अशी सूचना आहे.- सहारा संदीप कोलंबे,सदस्या रायगड जिल्हा परिषद
कर्जत तालुक्यामध्ये ५३ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:19 AM