पनवेल - पनवेल महापालिकेच्या मी 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठी 54 हजार 558 जण परीक्षा देणार असल्याचे निश्चित झाले आहे.15 सप्टेंबर पर्यंत या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती.1 लाख 15 हजार जणांनी याकरिता अर्ज केले होते.यापैकी 54 हजार 558 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे.
टीसीएस मार्फत हि नोकर भरतीची प्रक्रिया केली जात आहे. या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा आदी पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पनवेल महानगरपालिका व टीसीएस यांनी निश्चित केलेल्या केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.
जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ, डिजीटल वॉचेस इत्यादी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.प्रत्येक केंद्रावरती सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावरती महापालिकेचा एक नियंत्रण अधिकारी व एक सहाय्यक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतून महापालिकेस प्रशिक्षित व उच्च शिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची माहिती आस्थापना उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे. प्रतिक्रिया भरतीप्रक्रिया अंत्यत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.