रायगड जिल्ह्यात ५४० गावे, १४९३ वाड्यांत जलदुर्भिक्ष, २०७ गावे-वाड्यांत २३ टँकर्सने पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:35 AM2019-05-07T02:35:03+5:302019-05-07T02:35:45+5:30
सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात १५८ गावांसाठी १९ टँकर्स सुरू होते. आता त्यात ४ टँकर्सची भर पडली आहे. मागणीनुसार टँकर्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.
उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २०३३ गाव-वाड्यांतील ४९ हजार ८५५ ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता ९ कोटी ४० लाखांचा पाणीटंचाई निवारण कार्यक्र म अमलात आणण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सर्व तालुका गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या संदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी घेतला.
जिल्ह्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरु वात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत गावे -वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे आदेश हळदे यांनी यावेळी दिले आहेत.
गटविकास अधिकारी तसेच सहायक विस्तार अधिकारी यांनी, आपापल्या भागात सातत्याने पाणीटंचाईबाबत आढावा घेत
राहावे, तसेच वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा व त्यानुसार उपाययोजना करावी. उप विभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवावा, असेही हळदे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी देखील बैठकीत मार्गदर्शन केले.
३१ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीस
१ कोटी २ लाखांचा निधी प्रस्तावित
जिल्ह्यातील १७ गावे आणि १४ वाड्या अशा एकूण ३१ ठिकाणच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीकरिता १ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मंजूर झाले असून कार्यादेशाची प्रक्रिया सुरूआहे. महाड तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मिंजुरीकरिता आले आहेत. तर पोलादपूर व कर्जतमध्ये प्रत्येकी एक प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहेत.
रायगड उन्हाळी पाणीटंचाई निवारण
निधी मागणी
३ कोटी
३५ लाख
प्राप्त निधी
३ कोटी
२ लाख
३७ विंधण विहिरींची दुरुस्ती : जिल्ह्यातील ५७ गावे आणि १०६ वाड्या अशा एकूण १६३ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्याकरिता ४१ लाख ८२ हजारांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी ४२ गावे व ४९ वाड्यांमध्ये एकूण ९१ ठिकाणच्या विंधण विहिरींच्या दुरुस्तीस मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २१ गावे व १६ वाड्या अशा एकूण ३७ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्यात आली आहे.
९० गावे व १० वाड्यांत २९ नवीन विंधण विहिरी
आॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यात विंधण विहिरींची कामे सुरू आहे. जिल्ह्यातील १३० गावे व ४४२ वाड्या अशा एकूण ५७२ ठिकाणी विंधण विहिरी घेण्याकरिता ३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित आहे. ५२ गावे आणि १८७ वाड्या अशा एकूण २२७ नवीन विंधण विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ९० गावे व १० वाड्यांमध्ये ३९ ठिकाणी विंधण विहिरी पूर्ण करण्यात आल्या, त्यापैकी २९ विंधण विहिरी यशस्वी झाल्या आहेत. सर्वाधिक विंधण विहिरी महाड, पोलादपूर, पेण या तीन तालुक्यात आहेत.