जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने

By admin | Published: February 14, 2017 05:03 AM2017-02-14T05:03:35+5:302017-02-14T05:03:35+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवशी

557 candidates face a face-to-face in the district | जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने

जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने

Next

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवशी जिल्हा परिषद (निवडणूक विभाग) मधून १७ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली, तर पंचायत समिती (निर्वाचक गण) मधून २७ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली. अशी एकूण ४४ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली. आता जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २१ उमेदवार तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकू ण १८ जागांसाठी ६७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी कळंब जिल्हा परिषद निवडणूक विभागातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे यांनी कशेळे गणातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष आघाडी घट्ट झाली आहे. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कालपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवीत आहोत असे सांगत होते, परंतु सोमवारी नेरळ व अन्य ठिकाणावरून शिवसेनेचे ए बी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस -शिवसेनेची छुपी युती उघड झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यावेळी काही उमेदवार आणि काही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी निवडणूक चिन्हे वाटप केल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. (वार्ताहर)
पोलादपूरमध्ये १६ उमेदवारांचे अर्ज मागे
पोलादपूर : तालुक्यातील चार पंचायत समिती गणातील १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार तर जिल्हा परिषदेच्या सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत.गोवेले गणामध्ये शिवसेनेच्या मंजूश्री अहिरे व शेकाप-काँग्रेस युतीच्या नंदा चांदे यांच्यात लढत होणार आहे. देवळे गणातील तुकाराम केसरकर, संतोष घाडगे, अनिल मालुसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
शिवसेनेचे अनिल दळवी, शेकाप-काँग्रेस युतीचे शैलेश सलागरे व लक्ष्मण पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.लोहारे गणातील संगीता कासार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून येथे शिवसेनेचे यशवंत कासार, काँग्रेस-शेकापचे संजय जंगम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सखाराम दवे व भाजपाचे सुरेश पालपीतकर यांच्यात लढत होत आहे. कोंढवी गणातील सीमा शिंदे, संगीता शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपतर्फे रचना कदम, शिवसेनेतर्फे सायली शिंदे, काँग्रेस-शेकाप तर्फे दिपीका दरेकर
व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रमिला शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे.देवळे जि. प. गटातील भाविका सुतार, अंजली सलागरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या अरुणा सुतार व शेकाप-काँग्रेस युतीच्या सुमन कुंभार यांच्यात लढत होणार आहे. तर लोहारे गटातील अर्पणा जाधव, शिवाजी जाधव, अनिल भिलारे, महादेव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी सुभाष जाधव, शेकाप-काँग्रेसचे कृष्णा कदम यांच्या तिरंगी लढत होणार आहे.
पेण : निवडणूक रिंगणात ८१ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या ३३ अर्जापैकी १६ उमेदवारी अर्ज माघारी घेतले तर पंचायत समितीच्या ४८ अर्जापैकी १६ अर्ज माघारी घेतले.एकू ण३२ अर्ज माघारी घेतल्याने ८१ पैकी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये रावे जिते पाबळ काराव या गटात प्रत्येकी ३ असे १२ उमेदवार तर वडखळ गटात ५ असे १७ उमेदवार तर पंचायत समितीच्या ९ गणात प्रत्येकी ३ या प्रमाणे २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
उरणमध्ये ४३ उमेदवार रिंगणात
उरण : तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेसाठी १७ तर पंचायत समितीसाठी एकूण २६ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उरणमध्ये जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी २६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २६ उमेदवार रिंगणात आहेत.
श्रीवर्धनमध्ये नऊ उमेदवार रिंगणात
श्रीवर्धन : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पंचायत समितीसाठी ३० तर जिल्हा परिषदेसाठी ११ असे एकूण ४१ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले
होते. त्यापैकी छाननीमध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष अजय अरु ण पोलेकर व कुसुम रामचंद्र दोडकुलकर यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले होते. चार पंचायत समिती गणात १७ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
श्रीवर्धनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यादरम्यान शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, नॅशनल काँग्रेस, मनसे समवेत काही बंडखोर अपक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता दिसत असली तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात होईल. बागमंडला गणातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने या गणात आता ६ जण रिंगणात आहेत.
अलिबागमध्ये २९ उमेदवारांची माघार
अलिबाग तालुक्यातील असणारी थळ मतदार संघातही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. शिवसेनेने मानसी दळवी यांनी उमेदवारी दिली आहे. त्याही अध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे येथे शिवसेनेच्या मानसी दळवी, शेकापच्या चित्रा पाटील आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये तिरंगी लढत अनुभवाला मिळणार आहे. अलिबाग तालुक्यामध्ये एकूण सात मतदार संघ आहेत, तर १४ पंचायत समितीचे मतदार संघ आहेत. जिल्हा परिषदेसाठी १३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. येथून २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Web Title: 557 candidates face a face-to-face in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.