उरण - उरण येथील जेएनपीटी सेझने ४४ एकर जागा दुबईच्या डीपी वर्ल्ड्स इंडिया अम्स हिंदुस्थान इन्फ्रालॉग प्रा. लि. या बंदराला ५६६.३ कोटी या भावाने ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा करार केला आहे, तसेच एसएमई विभागाची ३१ एकर जागा १५ गुंतवणूकदारांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी दिली.जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्राने ६८४ एकर जागा आहे. रोजगाराला चालना देणे, गुंतवणूकदारांत वाढ करणे, या प्रमुख उद्देशांबरोबच जेएनपीटी बंदराची कंटनेर हाताळणीची क्षमता वाढविणे, याचाही यात समावेश आहे. आतापर्यंत जेएनपीटीने ७५ एकर जागा ६३० कोटी रु पयांनी गुंतवणूकदारांना ६० वर्षांसाठी या आधीच भाडेतत्त्वावर दिली आहे.जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अनेक उद्योजक, लॉजिस्टिक कंपन्या आर्थिक गुंतवणूक करण्यात उत्सुक असून, चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनाने केला आहे.जेएनपीटी सेझ मुंबईच्या जवळ आहे. नवीन येऊ घातलेले नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ हे जेमतेम १५ किमी अंतरावर असून, जेएनपीटी बंदरापासून केवळ पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथे जास्तीतजास्त गुंतवणूक होऊ शकते, असे जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी सांगितले.कला व क्रीडा क्षेत्रासही अधिक चालना मिळावी, यासाठी जेएनपीटी प्रशासनाने विशेष आर्थिक क्षेत्रात ५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी मुबलक पाण्याचा पुरवठा, नियमित वीजपुरवठा, माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे, ग्राहक कार्यालय, प्रशासन कार्यालय, प्रशिक्षण केंद्रे, वाहन तळे, सांडपाणी प्रक्रि या प्रकल्प आदी गोष्टींची तरतूद केल्याची माहिती बन्सल यांनी दिली.सल्लागारांची विशेष नेमणूकजेएनपीटीने या सर्व कामांसाठी स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटी नेमलेलीअसून, इमारती, तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एपीसी आणि पीएमसी यासारख्या सल्लागारांची विशेष नेमणूक केलेली आहे.आतापर्यंत जेएनपीटी सेझ प्रकल्पाचे ३५ टक्के काम झालेले असून, जुलै २०१९ पर्यंत जेएनपीटी सेझ पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी अपेक्षाही जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी व्यक्त केली आहे.
जेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 6:00 AM