जिल्ह्यात घरफोडीचे ५७२ गुन्हे
By admin | Published: September 24, 2015 12:27 AM2015-09-24T00:27:14+5:302015-09-24T00:27:14+5:30
रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे.
जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात दरोड्याचे चार, जबरी चोरीचे ४१, घरफोडीचे १५३ तर चोरीचे ३७४ असे ५७२ गुन्हे दाखल झाले असून या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ३०० गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या ५७२ गुन्ह्यांत गुन्हेगारांनी तब्बल १० कोटी ६५ लाख २१ हजार ८८३ रुपयांचा ऐवज लंपास केला होता, त्यापैकी ६ कोटी २४ लाख २३ हजार ५३४ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलिसांचे हे गुन्हे उकल प्रमाण ५८.६० टक्के आहे.
चार दरोड्यांच्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आली. या दरोड्यांत लंपास केलेल्या २ लाख ७ हजार २८० रुपयांच्या ऐवजापैकी केवळ १ हजार ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवता आला असून हे गुन्हे उकल प्रमाण ०.६० टक्के आहे.
जबरी चोरीचे जिल्ह्यात ४१ गुन्हे दाखल झाले, त्या प्रकरणी ३५ जणांना अटक करण्यात आली. या ४१ जबरी चोऱ्यांमध्ये १ कोटी १७ लाख ३८ हजार ८२० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
२४ जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, यात ८ लाख ५२ हजार ९२० रुपयांचा ऐवज परत मिळवला आहे. हे गुन्हे उकल प्रमाण ७.२६ टक्के आहे.
चोरीचे जिल्ह्यात ३७४ गुन्हे दाखल झाले, त्यात २१५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. १२७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व चोऱ्यांमध्ये चोरीस गेलेल्या ८ कोटी ३८ लाख २ हजार ५९१ रुपयांच्या ऐवजापैकी ६ कोटी ५ लाख ३२ हजार ४५५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी परत मिळवला असून हे गुन्हे उकल प्रमाण ७२.२३ टक्के आहे.
घरफोडीचे जिल्ह्यात १५३ गुन्हे दाखल झाले, त्यातील केवळ २२ गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांना आतापर्यंत करता आली आहे. या गुन्ह्यांमध्ये ४८ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. घरफोड्या करुन चोरट्यांनी लंपास केलेल्या एकूण १ कोटी ७ लाख ७३ हजार १९२ रुपयांच्या ऐवजापैकी १० लाख ३६ हजार ७५९ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून याचे गुन्हे उकल प्रमाण ९.६२ टक्के आहे.