दर तासाला ५७६ वाहने कोकणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:24 AM2018-09-12T05:24:09+5:302018-09-12T05:24:25+5:30
कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे.
अलिबाग : कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताकरिता कोकणातील आपापल्या गावी पोहोचणाºया चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढली आहे.
सोमवारी रात्री तासाला ५७६ वाहने या मार्गावरून मार्गस्थ झाली. तर, सहा तासांत एकूण तीन हजार ४५६ विविध प्रकारच्या वाहनांतून एक लाखापेक्षा अधिक चाकरमानी गणेशभक्त कोकणात रवाना झाल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या नियोजनानुसार, सोमवारी ३५५ एसटी कोकणात रवाना झाल्या. त्यामधून एकूण १७ हजार ७५० गणेशभक्तांनी प्रवास केला.
या वाहतुक नियंत्रणासाठी रायगड पोलीस दलास साहाय्य करण्याकरिता विनामोबदला काम करण्याकरिता १४० पोलीस मित्र २४ तास कार्यरत आहेत. ते पळस्पे ते कशेडी या टप्प्यात पेण, वडखळ, वाकण, पाली, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड आणि पोलादपूर येथे मार्गदर्शन करत आहेत.
दरम्यान कोकणवासीयांनी एसटीलाच अधिक पसंती दिल्याचे आरक्षित एसटी संख्येवरून दिसून येते असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. सेनापती बापट मार्गावरून मुंबईतील जादा एसटी कोकणाकडे रवाना झाल्या. त्यावेळी मंत्री रावते यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. मुंबईतील गणपती विशेष फेºया मंगळवारी मार्गस्थ करण्यात आल्या.
>चार दिवसांत एक हजार चाकरमान्यांनी घेतले टोल फ्री पास
ठाणे : कोकणात जाणाºया चाकरमान्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात टोल फ्री पास घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. मागील चार दिवसांत जवळपास एक हजार चाकरमान्यांनी हे पास घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास टाळण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे टोल फ्री पास घेऊन वेळ आणि इंधन खर्चून कोकण गाठण्याची तयारी के ल्याचे बोलले जात आहे. ंशनिवारपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील मध्यवर्ती जेल व मर्फी कार्यालयात त्यांच्या वाटपास सुरुवात झाली आहे. त्यातच पहिला शनिवार असतानासुद्धा या दिवशी दोन्ही कार्यालयांतून २२० पासचे वाटप झाले होते. मात्र, रविवारची सुटी असताना अवघे ५० पास गेले होते. तसेच सोमवारी काँग्रेस पक्षाने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या दिवशी जवळपास ४९० पासचे वाटप झाले. मंगळवारीही टोल फ्री पाससाठी आरटीओत गर्दी झाली होती. दुपारी साडेतीनपर्यंत २५० पास वाटप झाले. तर सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत पास वितरित होणार असल्याने आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाण्या-येण्याचा दुहेरी पास असल्याचे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक म्हणाले.