शिव हर हर महादेव... रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:30 AM2018-02-14T05:30:53+5:302018-02-14T05:40:46+5:30
अलिबाग : ‘हर हर महादेव’... ‘ओम नम: शिवाय’च्या गजरात रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शंभो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी भजन, कीर्तनासह विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग : अलिबाग येथील उंच डोंगरावर असलेल्या श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. शहरातील काशीविश्वेश्वर मंदिर, वेश्वीतील गोकुळेश्वर, खंडाळा डोंगरावरील रामधर्णेश्वर, चौल येथील कुंडेश्वर, रामराज विभागातील ताजपूर येथील पिंपळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलिमरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात भाविकांनी शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये काही संस्थांनी सामाजिक उपक्रमही राबवले.
चौलमध्ये मंदिरांत गर्दी
रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौलमधील आंबेपूर फाटा येथील शिवदत्त मंदिर, कुंडेश्वर, रामेश्वर शिवमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. भजन,अभिषेक, पालखी सोहळा, प्रवचन असे कार्यक्र म झाले. मंदिर परिसरात यात्रा भरल्या होत्या.
बोर्लीमांडलामध्ये यात्रा
बोर्लीमांडला : महाशिवरात्रीच्या निमित्ताने बोर्लीमांडला विभागातील कोर्लई किल्ल्यावर असलेल्या शिवमंदिरात, बोर्ली येथील पिंपळी पुलानजीक आणि मांडला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शन आणि पूजा विधी, अभिषेक करण्यासाठी पहाटेपासून शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या.
भक्तांनी घेतले दर्शन
नागोठणे : महाशिवरात्री उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पुरातन रामेश्वर मंदिरात सकाळी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. दिवसभरात हजारो शिवभक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले. सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुरातन श्री क्षेत्रपाल मंदिर
आगरदांडा : शहरातील दत्तमंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेले जुने व पुरातन श्री क्षेत्रपाल मंदिर असून, येथे जागृत व स्वयंभू शंकराचे स्थान आहे. मंदिरात शंकराची पिंडी, तसेच मुख्य मूर्ती क्षेत्रपाल, खेम, धावीर व कोटेश्वरी अशा चार मूर्ती पुरातन काळापासून आहेत. मंदिरात अभिषेक व होमहवन करण्यात आले होते.
पोयंजेतील शिवमंदिरात लाल किल्ल्याची प्रतिकृती
मोहोपाडा : पोयंजेत पुरातन जागृत शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ही सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लाल किल्ला व इतर सजावटीसाठी पोयंजे येथील युवा तरुणांनी दहा दिवस अथक मेहनत घेतल्याचे सचिन कडव यांनी बोलताना सांगितले. या वेळी प्रसाद म्हणून १०० किलो खजूर वाटप करण्यात आले. मंदिरात लघुरु द्राभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यानिमित्त पोयंजे येथे मोठी यात्रा भरत असते.
पनवेलमध्ये ४५ लीटर दुधाचे मुलांना वाटप
पनवेल : महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. मंगळवारी ४५ लीटर दूध गरीब मुलांना वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त रोट्रॅक्ट क्लब आॅफ पनवेलने हा अनोखा उपक्रम हाती घेतला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतात. रोट्रॅक्ट क्लब आॅफ पनवेलने शहरातील वडाळे तलावाजवळील रामनाथ मंदिराजवळ भक्तांना समुपदेशन करून गरीब मुलांना दूध वाटण्याबाबत समजावून सांगितले. या उपक्र मातून तब्बल ४५ लीटर दूध गोळा झाले.
म्हसळा तालुक्यात धार्मिक कार्यक्रम
म्हसळा : तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्री आनंद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील लखमेश्वर मंदिर, देवघर (अमृतेश्वर) येथील स्वयंभू लखमेश्वर मंदिर, मौजे घूम येथील घुमेश्वर मंदिर, पाष्टी कुणबी वाडी, तोंडसुरे, वारळ, काळसुरी येथील शिवमंदिर येथे महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. लखमेश्वर मंदिरात पहाटेपासून विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले. पालखी सोहळा, अभिषेक, भजन-कीर्तनाच्या माध्यमातून मंदिराचा परिसर भक्तिमय झाल्याचे दिसून आले. राजस्थान हिंदू समाज व हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या विद्यमाने भाविकांना फलाहार वाटप करण्यात आला. घुमेश्वर शिवमंदिरात अभिषेक, दिंडी, पूजा-पाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्र म आयोजिले होते.