जिल्ह्यातील ६७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:57 AM2018-06-16T04:57:33+5:302018-06-16T04:57:33+5:30
शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे पटसंख्या वाढली असली तरी जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांच्या इमारती किमान ५० वर्षे जुन्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी त्या वापरात नसल्याने वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीकरिता सुमारे ६ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळांची अवस्था पाहून आपला पाल्य याठिकाणी सुरक्षित शिक्षण घेईल की नाही, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. शाळा दुरुस्तीसाठी अपेक्षित असलेला सहा कोटींचा निधी मिळवणे ग्रामीण शिक्षण प्रक्रियेत अडचणीचे ठरत आहे. या शाळांची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर एकूण शाळांपैकी २० टक्के शाळा वापरायोग्य राहणार नाहीत. बहुतांश शाळा ५० वर्षे जुन्या असून कित्येक वर्षांत रंगरंगोटी, देखभाल दुरुस्ती झालेली नाही. शाळेच्या इमारतींमध्ये पूर्वी पाच ते सहा वर्गखोल्या वापरात होत्या. मात्र, पटसंख्या कमी झाल्याने आता दोन वा तीन वर्गखोल्याच वापरात आहेत. बंद वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने गळती, भिंतीची पडझड यामुळे मुलांना बसण्याकरिता वर्गखोल्या धोक्याच्या झाल्या आहेत.
माणगाव तालुक्यात सर्वाधिक
९१ शाळांचे दुरुस्ती प्रस्ताव
रायगड जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्ती प्रस्तावांपैकी सर्वाधिक शाळा दुरु स्तीचे ९१ प्रस्ताव माणगाव तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यांत महाड -८४, पेण - ६८, सुधागड - ५९, पनवेल -५६, म्हसळा-५३, कर्जत -४७, खालापूर-३८, श्रीवर्धन-३७, तळा-३३, अलिबाग-३०, मुरु ड-२९,रोहा-२०, उरण-१३ तर पोलादपूर तालुक्यात १२ दुरुस्ती प्रस्ताव आहेत.
जेएसडब्ल्यू व्यवस्थापन सकारात्मक
जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता लागणारा निधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळावा, याकरिता कंपनी व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. या कामाकरिता कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत कंपनीकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार असल्याचे रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले.