अलिबाग : तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून एकूण ५९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. चेंढरे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात सरपंचपदासाठी पाच पैकी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने दोन उमेदवार सरपंच पदासाठी शिल्लक आहेत. तर सदस्यपदासाठी ५९ अर्ज आले होते. त्यातील २६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३३ उमेदवार रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे वरसोली ग्रामपंचायीमध्ये सरपंचपदासाठी चार अर्ज आले होते. त्यातील दोघांनी माघार घेतल्याने दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर सदस्य पदासाठी ५८ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३० उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावणार आहेत. २३ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.
चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायती अलिबाग शहराला अगदी लागून असलेल्या ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुशिक्षित मतदार आहेत. सुशिक्षित मतदारांच्या संख्येमध्ये चेंढरे ग्रामपंचायत पुढे आहे. चेंढरे ग्रामपंचायतीवर गेली दोन दशके शेकापची सत्ता आहे. शेकापची सत्ता उलटून टाकण्यासाठी चेंढरे परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे दत्ता ढवळे यांच्या पत्नीला सरपंचपदासाठी उमेदवारी नाकारल्याने ते आघाडीपासून दूर गेले होते. ढवळे यांनी त्यांच्या पत्नी प्रिया ढवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आव्हान उभे केले होते. त्यामुळे परिवर्तन विकास आघाडी हवालदिल झाली होती. आघाडीत फूट पडणे हे शेकापच्या पथ्यावर पडणारे होते. त्यामुळे शेकापच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ढवळे यांनी त्यांच्या पत्नीचा सरपंचपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेत आघाडी सोबत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आघाडीच्या उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा रस्ता मोकळा झाल्याचे चित्र आहे. ढवळे यांनी अर्ज मागे घेतल्याने आघाडीच्या उमेदवाराची ताकद वाढली असली तरी शेकापच्या उमेदवार स्वाती पाटील यांच्यासाठी हे आव्हान खडतर असल्याचे दिसून येते.आघाडीच्या अन्य उमेदवारांनी दत्ता ढवळे आणि प्रिया ढवळे यांच्याविरोधात दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे येथे थेट लढत आघाडी विरुध्द शेकाप अशीच राहणार आहे. आघाडीमध्ये शिवसेना, भाजप, दत्ता ढवळे गट आणि काँग्रेस सारख्या राजकीय पक्षाचा समावेश आहे.
वरसोली ग्रा.पंचायतीमध्ये सरपंच मिलिंद कवळे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनल उभारण्यात आले आहे. तेथेही त्यांची लढत शेकापसोबत होणार असल्याचे दिसते. अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराच्या तोफा चांगल्याच धडधडणार आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी सगळेच कामाला लागले आहेत. चेंढरे ग्रामपंचायत ही सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे याच ग्रामपंचायती भोवती मातब्बर नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. जे. टी. पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, भाजपचे अॅड. महेश मोहिते, दत्ता ढवळे त्याचप्रमाणे शेकापचे आस्वाद पाटील, संजय पाटील यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे देखील विशेषत: चेंढरे ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्जच्तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार असून या दोन्ही ठिकाणी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.च्२३ जून रोजी मतदान प्रक्रिया पर पडणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.च् पुढील दहा दिवस प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे. दोन्ही ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी सगळेच कामाला लागले आहेत.च्चेंढरे ग्रामपंचायत ही सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे याच ग्रामपंचायतीभोवती लक्ष केंद्रित केले आहे.