अलिबाग : अलिबाग-वडखळ या नव्याने विकसित होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी ६०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. त्यामुळे २२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शेकापचे विधान परिषदेचे सदस्य आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. विरार-अलिबाग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर अशा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक प्रगती झपाट्याने होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गापेक्षा उत्तम प्र्रतिचे रस्ते तयार केले जाणार आहे. काम सुरु केल्यानंतर दोन वर्षांमध्ये काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अलिबागपासून सुरु होणारा हा चार पदरी महामार्ग कार्लेखिंडीत आल्यावर तेथे दोन किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तेथून पुढे पेझारी चेकपोस्टमार्ग धरमतर पूल नव्याने उभारण्यात येणार आहे. तेथून पुढे शहाबाज नंतर थेट वडखळपर्यंत हा मार्ग जाऊन ही जागा वनखात्याची असल्याने त्याला परवानगी मिळणे कठीण असते. बोगद्यासाठी परवानगी मिळण्यास जास्त वेळ लागत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.सुरवसे यांनी सांगितले. २२ किलोमीटरचा हा महामार्ग पूर्णत: सिमेंट काँक्रीटचा राहणार असून शहाबाज ते आंबेघर हा ५.८ किलोमीटरचा बायपास मार्ग केल्यामुळे या विभागातील कमीत कमी विस्थापन होण्यास मदत मिळणार आहे, असेही सुरवसे यांनी स्पष्ट केले. 300 कोटी रुपये बोगद्यांसाठी खर्च केले जाणार असून ३०० कोटी रुपयांचे रस्ते केले जाणार आहेत. या मार्गावर उच्चप्रतिची स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. पार्किंगचीही व्यवस्था केली जाणार आहे. चार छोटे पूल आणि एक मोठा पूल उभारण्यात येणार आहे. नव्याने विकसित होणाऱ्या या मार्गावर गॅस पाइप लाइन, पाण्याची पाइप लाइन, विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. ताशी १००-१२० किलोमीटर प्रतिवेगाने वाहने धावू शकणार आहेत.
रस्त्यासाठी ६०० कोटी
By admin | Published: October 09, 2015 11:57 PM