पोलीस पाटलांना हवा सहा हजार मासिक भत्ता
By Admin | Published: January 3, 2016 12:38 AM2016-01-03T00:38:38+5:302016-01-03T00:38:38+5:30
पोलीस हा सरकार व समाज यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना गावकामगार पोलीस पाटील यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेणारे मंत्री होते.
पेण : पोलीस हा सरकार व समाज यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना गावकामगार पोलीस पाटील यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेणारे मंत्री होते. मात्र पोलीस पाटीलकी करणाऱ्यांचा पाटीलच इहलोक सोडून परलोकी गेल्याने आमचा खरा आधारस्तंभच आज हयात नाही. मात्र त्यांनी केलेली ५०० रुपयांची वाढ अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही. तरीही राज्यव्यापी गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस पाटलांना ६००० रुपये मासिक भत्ता मिळावा, यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील आहोत. आबांच्या जाण्याने पोलीस पाटलांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गावच्या पोलीस पाटलांचा आधारवड ठरणारा आबा पाटील तथा आर. आर. पाटील यांचे पुण्यस्मरण महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पेण येथील पोलीस पाटील दिन समारंभात केले.
पेण तालुका गावकामगार पोलीस पाटील संघटनेचा २५ वा वर्धापन दिन सोहळा पेणच्या महात्मा गांधी ग्रंथालय प्रांगणात संपन्न झाला. सकाळी ९ ते १२ रक्तदान शिबिरांत ३० बॉटल रक्त , दुपारी पोलीस पाटलांना मार्गदर्शन शिबिर, तर सायंकाळी गुणीजणांचा सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शनपर बोल अशा दोन सत्रांत दिवसभर कार्यक्रमाची रूपरेषा होती. गौरव समारंभात व्यासपीठावर महाराष्ट्र पोलीस संघटना अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव कमलाकर मांगले, रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत पाटील, महादेव दिवेकर, झेडपी सदस्य सदस्य डी. बी. पाटील, पेण व तालुका शेकाप चिटणीस भास्कर पाटील, तळ कोकणासह रायगडातील तालुका अध्यक्ष पेणमधील १०३ पोलीस पाटील सदस्य व निवृत्त सदस्यांसह गांधी मंदिर अध्यक्ष अरविंद वनगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
गुणवंतांचा सत्कार
अश्विनी वास्कर (बॉडी बिल्डर), सोनाली मालसुरे (तलवारबाजी), प्राजक्ता टेटमे (कराटे), कल्पेश ठाकूर (समाजसेवा), हरिश्चंद्र दुदुस्कर (राज्य पोलीस पाटील पुरस्कार), सचिन कोठावले (रायगड भूषण, जीवनरक्षक पुरस्कार), अक्षता कवघरे (जलतरण), कुमार ठाकूर (१० वर्षांखालील धरमतर - गेट वे अंतर पार), मिलिंद ठाकूर (७० वेळा रक्तदान), झेडपी सदस्य डी. बी. पाटील (६५ वेळा रक्तदान) झेडपी सदस्य डी. बी. पाटील (२५ वेळा रक्तदान) या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.